Download App

भारताचा नवा शत्रू अन् पाकिस्तानचा पक्का मित्र; 7 पॉईंट्समध्ये समजून घ्या पाक-तुर्कीची दोस्ती

तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे सुद्धा देत आहे.

Pakistan Turkey Relation : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (India Pakistan War) संबंध कमालीचे ताणले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून (Operation Sindoor) पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर (Pahalgam Terror Attack) बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना भारतीय सैन्य (Indian Army) जोरदार उत्तर देत आहे. फक्त युद्धाच्या मैदानावरच नाही तर कूटनिती वापरूनही पाकिस्तानला नामोहरम केले जात आहे.

भारताच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळेच आज जगातील चीन आणि तुर्की वगळून एकही देश पाकिस्तानला थेट पाठिंबा देताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात परराष्ट्रांशी संबंध अतिशय मजबूत केले आहेत. याचाच परिणाम म्हणून आज एकही देश पाकिस्तानचे उघडपणे समर्थन करताना दिसत नाही.

परंतु तुर्कीने मात्र कोणताही विचार न करता पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या मदतीसाठी शस्त्रास्त्रे सुद्धा देत आहे. शुक्रवारी (9 मे) पाकिस्तानने तुर्कीच्या ड्रोनच्या मदतीनेच भारताच्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घडामोडी घडत असताना प्रश्न असा पडतो की तुर्की पाकिस्तानला मदत करण्यासाठी इतका आतुर का आहे? दोन्ही देशात असे कोणते संबंध आहेत? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..

ब्रेकिंग : भारताविरूद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अ‍ॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

तसं पाहिलं तर पाकिस्तान आणि तुर्की यांचे (Pakistan Turkey Relation) संबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. कूटनितीपासून ते संरक्षणापर्यंत दोन्ही देशांनी अनेक करार केले आहेत. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना यात तुर्कीची नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. सात असे ठळक मुद्दे आहेत या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

1. तुर्कीने अनेक आघाड्यांवर पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला आहे. सामाजिक, आर्थिक, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रात तुर्कीने पाकिस्तानची मदत केली आहे. ज्या द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारावर पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात आला त्या सिद्धांताला तुर्कीने नेहमीच पाठिंबा दिला आहे. काश्मिरच्या बाबतीत पाकिस्तान जितकी गरळ ओकतो त्याला देखील तुर्कीचे समर्थन असतेच. ज्यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी तुर्कीचे राष्ट्रपती पाकिस्तानी पीएम शाहबाझ शरीफ (Shahbaz Sharif) यांची भेट घेण्यासाठी आले होते.

2. पहलगाम हल्ल्यानंतर सगळे जग भारताच्या पाठीशी असताना नेमक्या याच वेळी तुर्कीने पाकिस्तानला लष्करी मदत केली होती असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

3. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. यावेळी सहा तुर्कीश मिलिट्री एअरक्राफ्ट पाकिस्तानला पोहोचले होते. या एअरक्राफ्टमध्ये हत्यारे आणि अन्य लष्करी साहित्य होते असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. तुर्कीने मात्र असे सगळे दावे नाकारले होते.

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारातील उपस्थिती म्हणजे थेट सामील; शरद पवारांचा पाकिस्तानवर वार

4. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीची युद्धनौका कराचीला पोहोचली होती. यानंतर या नौकेने येथे काही सैन्य अभ्यासात भागही घेतला होता. तुर्कीने या घडामोडींना सामान्य प्रक्रिया म्हटले तर पाकिस्तानने याला शिष्टाचाराशी जोडले.

5. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला त्यावेळी तुर्कीने पाकिस्तान प्रति संवेदना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी तुर्कीच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानी पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली होती. इतकेच नाही तर भारताचे हे ऑपरेशन सिविलियन्स विरोधात असल्याचा आरोप तुर्कीने यावेळी केला होता.

6. पाकिस्तानने ज्यावेळी पहिल्यांदा भारतावर ड्रोन हल्ला केला त्यावेळी या हल्ल्यासाठी तुर्कीचे ड्रेन वापरण्यात आले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत या गोष्टीचा खुलासा केला होता.

7. तुर्कीने पाकिस्तानला फक्त ड्रोनच नाही तर PNS खैबर आणि बाबर या युद्धनौका दिल्या आहेत. या व्यतिरिक्त यामध्ये PNS तारिक आणि PNS बदर सुद्धा आहेत. इतकेच नाही तर आगामी काळात अनेक हत्यारे तुर्की पाकिस्तानला देणार आहे अशीही माहिती हाती आली आहे.

follow us