Italy News : एखादा देश किंवा एखाद्या शहरात येण्याजाण्यावर बंदी घातली जाऊ शकते. एकवेळ तुमच्या बोलण्याच्या अधिकारावरही बंदी आणली जाऊ शकते पण आजारी पडण्यावरही बंदी घातली जाऊ शकते का? नाही ना पण थांबा असाच एक अजब आदेश एका शहरात निघाला आहे. घाबरू नका हे शहर आपल्या भारतातील नाही तर युरोपातील आहे. चला तर मग हा आदेश नेमका काय आहे, कुणी असा आदेश दिलाय, यामागे नक्की कारण तरी काय आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
CNN च्या रिपोर्टनुसार दक्षिण इटलीतील कॅलाब्रिया भागातील एक लहानसे शहर बेलकास्त्रोमध्ये हा आदेश जारी करण्यात आला आहे. शहराचे महापौर अँटोनियो तोरचिया यांनी हा अजब आदेश दिला आहे. या आदेशाने खळबळ उडाली आहे. सरकारी यंत्रणा असा आदेश कशा देऊ शकतात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या आदेशानुसार, शहरात आजारी पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष करून अशा आजारांवर बंदी घालण्यात आली आहे ज्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील.
एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी; सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
या आदेशाकडे काही जण गंमतीने पाहत आहेत. मात्र या आदेशाच्या माध्यमातून शहरातील खालावलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती महापौर तोरचिया यांनी दिली. बेलकास्त्रो शहराची लोकसंख्या फक्त 1300 इतकी आहे. यामध्ये बहुतांश लोक वृद्ध आहेत. शहरात एक आरोग्य केंद्र आहे पण केंद्राला कायमच टाळे लागलेले असते. सुट्टीचा दिवस, आपत्कालीन प्रसंगी किंवा रात्रीच्या वेळी येथे डॉक्टरच सापडत नाही. आसपासचे आरोग्य केंद्र देखील बंद असतात. या गोष्टींचा विचार करता लोकांच्या आजारी पडण्यावरच बंदी घालण्याचा आदेश दिल्याचे तोरचिया यांनी सांगितले.
लोकांना त्रास देण्याचा उद्देश नाही तर मदतीसाठीच हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाच्या माध्यमातून आम्ही शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता लोकांनी असे कोणतेच काम करू नये जेणेकरून ते आजारी पडतील किंवा त्यांना काही नुकसान होईल. घरातून सारखे बाहेर पडू नका. प्रवास करणं टाळा, जास्तीत जास्त वेळ आराम करा असा सल्लाही तोरचिया यांनी शहरवासियांना दिला आहे. दरम्यान, शहरात नियमितणे आरोग्य केंद्र जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत हा आदेश कायम राहील असेही बेलकास्त्रो शहराचे महापौर तोरिचिया यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! महाराष्ट्रात HMPV व्हायरसची एन्ट्री, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह