Download App

ब्रिटनमध्ये ‘सुनक’राज संपुष्टात! कंजर्वेटिव्ह पक्षाचा दणदणीत पराभव; लेबर पार्टीला बहुमत

या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे.

UK Elections 2024 : जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ब्रिटेनच्या सार्वत्रिक निवडणुकांचे (UK Elections 2024) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत ब्रिटेनमध्ये सत्तापालट झाला असून पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीचा दारुण पराभव झाला आहे. लेबर पार्टीने (Labour Party) मोठे बहुमत मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वातील कंजर्वेटिव्ह पार्टीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या निकालानंतर आता ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. यानंतर आता लेबर पार्टीचे कीर स्टार्मर पंतप्रधान (Keir Starmer) होतील. लेबर पार्टीने आतापर्यंत 650 पैकी 500 घोषित झालेल्या निकालात 348 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. ब्रिटनमध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करायचे असेल तर 326 जागांची आवश्यकता असते. यामध्ये लेबर पार्टी बहुमत मिळवत 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आयोग असतानाही PM करतात निवडणुकीची घोषणा; ब्रिटेनचं इलेक्शन भारतापेक्षा वेगळंच

बहुतांश एक्झिट पोल्सनुसार लेबर पार्टीला 410 ते 460 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ताज्या आकडेवारीनुसार 650 पैकी 500 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 348 जागा जिंकून लेबर पार्टीने बहुमताचा आकडा पार केला आहे.

सुनक राजीनामा देणार

निवडणुकीतील दणदणीत पराभवानंतर मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी स्टार्मर यांना शुभेच्छाही दिल्या. सुनक म्हणाले, लेबर पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल आले त्यानुसार आज निवडणुकीचे निकाल येत आहेत.

कोण आहेत कीर स्टार्मर ?

कीर स्टार्मर यांचा जन्म 1963 रोजी झाला. त्यांचे वडील टूलमेकर होते. आई नर्स होती. त्यांनी लेबर पार्टीचे संस्थापक कीर हार्डी यांच्या नावावरून मुलाचं नाव कीर स्टार्मर ठेवलं होतं. कीर स्टार्मर 2015 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2020 मध्ये त्यांनी पूर्ण लेबर पार्टीचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. कीर स्टार्मर यांनी अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यांतून भारताबाबत सकारात्मक दृष्टीकोन दाखवला होता. त्याचा परिणाम असा झाला की या निवडणुकीत लेबर पार्टीला ब्रिटनमधील भारतीयांनी भरभरून साथ दिली.

ब्रिटनला आगामी काळात आर्थिक सक्षम बनवू असे आश्वासन कीर स्टार्मर यांनी निवडणूक प्रचारात नागरिकांना दिले होते. त्यांच्या या आश्वासनावर लोकांनी विश्वास ठेवला. निवडणुकीत भरघोस मतदान केलं. आता निवडणुकीच्या निकालात कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वातील मजूर पक्षाने एकतर्फी विजय मिळवला आहे.

UK Visa India : आता ब्रिटनमध्ये कुटुंबाला घेऊन जाता येणार नाही; कारण..,

follow us