‘जी-7’परिषद! पंतप्रधान मोदींची माक्राँ, सुनक, झेलेन्स्की यांच्याशी चर्चा; पोप फ्रोन्सिस यांचीही भेट
G7 Summit 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी जी ७ समूहाच्या शिखर बैठकीसाठी इटलीतील अपुलिया अनेक महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांशी विविध विषयांवर चर्चा केली. (G7 Summit) या परिषदेस प्रथमच हजेरी लावणारे ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचीही मोदींनी भेट घेतली. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इटली आणि जपान या जी ७ समूहाच्या राष्ट्रांबरोबरच भारतासह आफ्रिका आणि आशियातील काही देशांशी संवाद साधण्याच्या ‘आऊटरीच’ धोरणाअंतर्गत या परिषदेचे निमंत्रण मिळाले आहे.
पोप फ्रान्सिस यांची भेट Modi 3.0 : मोदी सरकारची पहिलीच अग्नीपरीक्षा; 24 जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी परिषदेच्या यजमान आहेत. मोदी यांनी शिखर परिषदेत पोहोचल्यावर पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारताने घेतलेल्या महत्त्वाकांक्षी पुढाकारांची आणि करोना लशींच्या १०० कोटी मात्रा देण्याच्या भारताच्या यशाबाबत मोदींनी पोप यांना माहिती दिली. तसंच, युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, वातावरण आणि ऊर्जा, स्थलांतरण, अन्न सुरक्षा, कृत्रिम प्रज्ञेचा वापर असे अनेक मुद्दे कार्यक्रमपत्रिकेवर आहेत.
सुनक-मोदी भेट
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षी संबंधांवर चर्चा केली. व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये परस्परसंबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने आश्वासक पावलं टाकली जात असल्याचं दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून सुनक यांनी त्यांचं अभिनंदन केलं. तर, ब्रिटनमधील आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मोदी यांनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या.
झेलेन्स्की-मोदी भेट
मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. युक्रेन युद्धाच्या सद्य:स्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संवाद आणि सहमतीतूनच युक्रेन युद्धावर सर्वमान्य तोडगा निघू शकतो, असं मोदी यांनी सांगितलं. तोडगा निघण्यासाठी लागेल ती मदत करण्याची भारताची तयारी असल्याचंही मोदी यांनी झेलेनस्की यांना आश्वासन दिलं आहे.
माक्राँ-मोदी भेट
संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ अशा क्षेत्रांमध्ये भारत-फ्रान्स सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ यांनी म्हटलं आहे. जी ७ परिषदेच्या निमित्ताने या दोन नेत्यांमध्ये द्विपक्षी चर्चा झाली. एका वर्षांत हे दोघे चार वेळा भेटले आहेत. कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रातील नियमनाबाबत आणि सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटलीकरणाबाबत भारताने घेतलेल्या पुढाकाराचे माक्राँ यांनी या आवर्जून कौतुक केलं.