Zelenskyy’s direct warning to Russia : रशिया-युक्रेन युद्धाने आता आणखी भीषण वळण घेतलं असून युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढवला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, अवघ्या एका रात्रीत युक्रेनकडून शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. रशियाने जवळपास एक हजार ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यापैकी सुमारे 200 ड्रोन थेट राजधानी मॉस्कोच्या दिशेने झेपावत होते.
या अभूतपूर्व हल्ल्यामुळे मॉस्कोसह अनेक महत्वाच्या भागांमध्ये खळबळ उडाली. बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिणेकडील रोस्तोव प्रदेशातील एक मोठा तेल डेपो भीषण स्फोटानंतर पूर्णपणे उध्वस्त झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मॉस्कोमधीक कपोतन्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला देखील लक्ष करण्यात आले. स्फोट एवढा भीषण होता की तेल टाकीचे झाकण अनेक मीटर दूर जाऊन पडले, तर काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरले.
हल्ल्याचा परिणाम केवळ औद्योगिक प्रकल्पांपुरता मर्यादित राहिला नाही. ड्रोनचे अवशेष कोसळल्यामुळे काही निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले. जवळच्या शॉपिंग सेंटरला आग लागल्याचेही वृत्त आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उंच इमारती रिकाम्या करण्यात आल्या. या परिस्थितीमुळे मॉस्कोतील प्रमुख विमानतळांवरील उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली.
‘दुष्काळातही वसंत बहरेल’; सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचा विजयाचा विश्वास
युक्रेन जळाले तर मॉस्कोही जळेल, झेलेन्स्कींचा इशारा
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या कारवाईचे समर्थन करताना हा हल्ला रशियाने गेल्या आठवड्यात कीववर केलेल्या हल्ल्याला दिलेले प्रत्युत्तर असल्याचे सांगितले. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या युद्धयंत्रणेला मदत करणाऱ्या महत्त्वाच्या लक्ष्यांवर अचूक हल्ले केल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी झेलेन्स्की यांनी अत्यंत कठोर शब्दांत रशियाला इशारा दिला. आम्हाला हे युद्ध नको होते. पण जर युक्रेन जळाले, तर मॉस्कोही जळेल, असे ते म्हणाले. त्यांनी युक्रेनच्या लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांच्या कामगिरीचे कौतुक करत रशियाने आता युद्धाऐवजी राजनैतिक मार्ग स्वीकारण्याची वेळ आल्याचेही स्पष्ट केले.
विशेष म्हणजे हा हल्ला सुरू असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन कझान येथे आग्नेय आशियाई देशांच्या नेत्यांसोबतच्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. मात्र या मोठ्या हल्ल्यावर त्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
युद्धाची व्याप्ती वाढली, आता राजधानीही निशाण्यावर
2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात युक्रेनचे ड्रोन हल्ले मर्यादित स्वरूपाचे होते. 2023 मध्ये प्रथमच युक्रेनचे ड्रोन मॉस्कोपर्यंत पोहोचले, मात्र त्या वेळी हल्ल्यांचे प्रमाण तुलनेने कमी होते. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. युक्रेनने लांब पल्ल्याच्या हल्ल्यांची क्षमता विकसित केली असून रशियालाही राजधानीभोवती मजबूत हवाई संरक्षण व्यवस्था उभारावी लागली आहे. परिणामी युद्ध आता केवळ सीमावर्ती भागांपुरते मर्यादित राहिलेले नाही. दोन्ही देश एकमेकांच्या तेल डेपो, तेल शुद्धीकरण प्रकल्प, ऊर्जा केंद्रे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत.
ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब?; 20 जूनला सहा खासदारांच्या विलिनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता
जी-7 देशांचा युक्रेनला मोठा आधार
दरम्यान, मॉस्कोवरील या मोठ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जी-7 देशांनी युक्रेनला अतिरिक्त लष्करी मदतीची घोषणा केली आहे. युक्रेनला अधिक प्रगत हवाई संरक्षण प्रणाली, इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याची शस्त्रे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय रशियाच्या तेल आणि वायू व्यापारावरील निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहेत. आगामी हिवाळा लक्षात घेऊन युक्रेनच्या वीज आणि ऊर्जा गरजा भागवण्यासाठीही अतिरिक्त आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे आश्वासन जी-7 राष्ट्रांनी दिले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना रशिया-युक्रेन युद्ध संपवणे सुरुवातीला वाटले तितके सोपे नसल्याचे मान्य केले. दोन्ही देशांमधील तीव्र वैर आणि अविश्वासामुळे शांतता वाटाघाटी अधिकच कठीण बनल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच, मॉस्कोवर झालेल्या या विक्रमी ड्रोन हल्ल्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध आणखी धोकादायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे. आता या संघर्षाचा परिणाम केवळ रणांगणावरच नव्हे तर दोन्ही देशांच्या राजधानी आणि महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे.
