ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब?; 20 जूनला सहा खासदारांच्या विलिनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता
बंड केलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांची शिंदे गटातील विलीनीकरणाची अधिकृत घोषणा येत्या 20 जून रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Operation Tiger signed off : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात सुरू होती. आता या संपूर्ण प्रकरणाबाबतची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाची अधिकृत घोषणा येत्या 20 जून रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, हा दिवस शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा असल्याने या राजकीय घडामोडींना आणखी महत्व प्राप्त झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा बंडखोर खासदारांनी आपल्या सह्यांसह एक पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. या पत्रामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची भीती व्यक्त केली असल्याचे सांगितलं जात आहे. हे पत्र सुमारे 48 तासांपूर्वीच लोकसभा अध्यक्षांकडे करण्यात आले होते. मात्र त्याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा तातडीने करण्यात आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी केले जाण्याची शक्यता आहे. या बुलेटिनमध्ये संबंधित सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण झाल्याची नोंद असू शकते. त्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिनिधींना किंवा नेत्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊ शकतात. मात्र, अंतिम निर्णय हा लोकसभा अध्यक्षांच्याच अधिकारक्षेत्रात येत असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीने या घडामोडींना अधिकच वेग दिला. पक्षाचा व्हीप जारी करण्यात आलेला असताना देखील सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या बैठकीला केवळ संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार उपस्थित होते. त्यामुळे बंडखोरीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.
जून महिना, बंडखोरी अन् संजय… उद्धव ठाकरेंच्या राजकारणातील विचित्र योगायोगाची जोरदार चर्चा
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हेच सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या सर्व खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास पक्षीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, आमच्या पक्षाच्या चिन्हावर आणि पाठिंब्यावर निवडून आलात तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्या, असे आव्हान खासदारांना देण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही बंडखोरांवर जोरदार टीका करत, ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी ठरत असताना, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गट कोणती रणनीती आखतो याकडेही राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकूणच, 20 जून हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, शिवसेनेतील आणखी एका मोठ्या राजकीय विभाजनावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदे गटाची ताकद वाढणार की ठाकरे गट नव्या रणनीतीने प्रतिहल्ला करणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.