Rohit Pawar’s PA daughter found dead in Baramati : बारामतीतील रुई परिसरात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
रात्री घरातून निघून गेली होती मुलगी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.
दरम्यान, सकाळच्या सुमारास घराच्या परिसरातच मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात येत असून महत्त्वाचे पुरावे आणि नमुने संकलित केले जात आहेत. मृत्यूच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळावरील प्रत्येक बाब तपासली जात आहे.
मुलीचा स्वतःहून तिचे जीवन संपवले की, तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढणे टाळले जात असून तपासातील पुराव्यांच्या आधारेच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या प्रकरणात मुलगी घरातून बाहेर पडल्यापासून सकाळी मृतदेह आढळेपर्यंतच्या कालावधीतील घटनाक्रम तपासला जात आहे. तसेच परिसरातील माहिती, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार बारामतीत येणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दशावतारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलीच्या मृत्यूमागील नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे.
