Pune Ganeshotsav: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना पुण्यात डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात डीजे वाजवण्याच्या भूमिकेवर ठाम असताना, दुसरीकडे ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
नेपाळमधील महापुरामध्ये युपी-बिहारला अलर्ट! मुख्यमंत्री योगींचे प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश
याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी विद्याधर बापट यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. उत्सवाच्या दहा दिवसांत लाऊडस्पीकरचा आवाज आणि विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्याचबरोबर रस्त्यांवर मंडप उभारल्याने वाहतुकीची समस्याही निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
रस्त्यांऐवजी सार्वजनिक मैदानात गणेशोत्सव साजरा करा
गणेशोत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत बापट यांनी उत्सवाच्या पद्धतीत काही बदल करण्याची गरज व्यक्त केली. गणेश मंडळांनी रस्त्यांवर मंडप उभारण्याऐवजी सार्वजनिक मैदानांमध्ये मंडप उभारून तेथेच उत्सव साजरा करावा, अशी त्यांची मागणी आहे.
यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण कमी होईल आणि वाहतुकीला होणारा अडथळाही टाळता येईल. तसेच एकाच ठिकाणी उत्सवाचे आयोजन केल्यामुळे ध्वनीप्रदूषण आणि नागरिकांना होणाऱ्या इतर गैरसोयींवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे बापट यांचे म्हणणे आहे.
‘डीजे आणि लाऊडस्पीकर वाजवायचे असतील तर शहराबाहेर जागा द्या’
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर किंवा डीजे वाजवण्यास बापट यांनी आक्षेप घेतला आहे. डीजे किंवा लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर शहराच्या बाहेर मोकळी जागा निश्चित करावी आणि तेथे कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
गणेश विसर्जन मिरवणुकीबाबतही त्यांनी वेगळा पर्याय सुचवला आहे. शहरातील वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक शहराच्या हद्दीबाहेरून रिंगरोडच्या मार्गाने काढावी, अशी मागणी त्यांनी केली. अवजड वाहनांसाठी ज्या पद्धतीने शहरातील वाहतुकीवर निर्बंध असतात, त्याच धर्तीवर विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करता येईल, असे त्यांचे मत आहे.
शहराबाहेरच विसर्जन करण्याची सूचना
विसर्जनासाठीही शहरातील वाहतूक आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी बापट यांनी केली आहे. रिंगरोडच्या मार्गाने मिरवणूक काढल्यानंतर इंद्रायणी किंवा पवना नदीत मूर्ती विसर्जित करण्याचा पर्याय त्यांनी सुचवला.
मराठा समाजाच्या मागण्यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करा, विखे पाटलांचे निर्देश!
त्यांच्या मते, शहरातील मुख्य रस्ते बंद करून मोठ्या मिरवणुका काढल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कालसुसंगत बदल करण्याची गरज आहे.
‘सण साजरे करा, पण इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या’
“माझा सण साजरा करण्याला विरोध नाही. मात्र, सार्वजनिक सण साजरा करताना त्याचा इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,” अशी भूमिका विद्याधर बापट यांनी मांडली.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उत्सव बंद करण्याची मागणी नसून तो अधिक शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पुणेही ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करू शकते’
ध्वनीप्रदूषणमुक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमींकडून आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. सोलापूरसारख्या शहरांमध्ये सार्वजनिक उत्सव तुलनेने शांततेत साजरे होऊ शकतात, तर सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातही अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे शक्य आहे, असे बापट यांनी नमूद केले.
प्रियकरासाठी MPSC चा पेपर फोडला, पण फटका बसला अनेकांना; परीक्षेतील धक्कादायक प्रकार उघड
दरम्यान, बापट यांच्या भूमिकेला काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे, लाऊडस्पीकर, मंडप आणि विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनावरून प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी एकत्रितपणे मार्ग काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
