Shirur Fake Voter Registration : छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते महेबुब शेख यांनी शिरूर शहरातील मतदार यादीतील कथित बोगस नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार सादर करत मतदार यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या नावांची आणि त्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली. विशेषतः SIR प्रक्रियेनंतर झालेल्या नोंदणीची स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिरूर शहराचे रहिवासी नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी बनावट पीटीआर, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप महेबुब शेख यांनी तक्रारीत केला आहे. केवळ कागदपत्रांची औपचारिक तपासणी न करता त्यांच्या सत्यतेची संबंधित विभागांकडून खातरजमा करावी, तसेच संशयास्पद नोंदणीमागील संपूर्ण यंत्रणेचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. बनावट कागदपत्रे तयार करणारे आणि त्यांच्या आधारे मतदार नोंदणी करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रकरणाची तातडीने चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे महेबुब शेख यांनी सांगितले. मतदार यादीतील संशयास्पद नोंदींकडे दुर्लक्ष झाल्यास निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मतदाराची नोंदणी आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या पुराव्यांची पारदर्शक तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, याच प्रकरणी महेबुब शेख यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांचीही भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. शिरूर शहरातील नव्या मतदार नोंदणीसाठी कथित बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे पुरावे आणि नोंदणीची पद्धत त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. आता संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांकडेही तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे महेबुब शेख यांनी स्पष्ट केले.
शिरूरमधील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा तापला; महेबुब शेख यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
