उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या; राज ठाकरेंनाही मिश्किल टोला

ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेदरम्यान अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

News Photo   2026 11 01T214930.986

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंशी जवळीक आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट केली. “ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. लोकांच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते करतात. त्यांची जवळीक कोणाशी नाही आणि त्यांना जवळीक करण्याची गरजही नाही,” असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमातील तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीही पाहायला मिळाली. फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम सुरू ठेवण्याचा सल्ला देत राजकारण आपण सांभाळू, असा मिश्किल टोला लगावला होता.

दारू तीच, फक्त बाटली बदलली, फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला, राहुल गांधींना चीनच्या देणग्यांवरून सवाल

राज ठाकरे यांच्याबाबत अमृता फडणवीस यांना पुढच्या वेळी शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित असतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत, “त्यांनी हेडलाइन दिली आहे, ब्रेकिंग दिली आहे. पुढचं पुढे बघू,” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या उत्तरातून त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर हलक्याफुलक्या शब्दांत टिप्पणी केली.

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत सध्या विविध चर्चा सुरू आहेत. दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने त्यांच्या संभाव्य जवळिकीबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्पष्ट करताना कोणत्याही नेत्याशी वैयक्तिक जवळीक नसल्याचं सांगितलं, तर राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पुढे काय घडतं, हे पाहू, असं सूचक उत्तर दिलं.

Exit mobile version