राम मंदिरातील देणगी चोरीचा तपास पूर्ण! CCTV फुटेज आणि बँक व्यवहारांतून चोरीचे धागेदोरे उघड

Ram Mandir : अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी SITने तपास पूर्ण करत 8 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

News Photo   2026 09 26T163400.881

Ram temple theft case

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाचा (Ayodhya) विशेष तपास पथकाने तपास पूर्ण करत 8 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. चोरीशी संबंधित CCTV फुटेज, जप्त करण्यात आलेली रक्कम, बँक खात्यांची कागदपत्रं आणि साक्षीदारांचे जबाब या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 133 साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना CCTV फुटेजमधून चोरीच्या घटनांची माहिती समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. आरोपी अविनाश शुक्ला हा 85 वेळा देणगी चोरी करताना आणि 4 वेळा चोरीत मदत करताना CCTVमध्ये आढळल्याचं तपासात नमूद करण्यात आलं आहे. करुणेश पांडे याच्यावर 2 वेळा चोरी केल्याचा आणि 68 वेळा चोरीत मदत केल्याचा आरोप आहे. लव कुश मिश्रा याने 1 वेळा चोरी केल्याचं, तर 52 वेळा इतरांना मदत केल्याचं तपासात समोर आलं आहे. अनुकल्प मिश्रा याच्यावर 56 वेळा चोरीत मदत केल्याचा, तर रामाशंकर मिश्रा याच्यावर 1 वेळा चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

रामाशंकर यादव उर्फ टिन्नू यादव याचा भाचा मनीष यादव एप्रिल 2026 मध्ये कामावर रुजू झाला होता. पोलिसांच्या तपासानुसार, 15 एप्रिल ते 3 जून या कालावधीत मनीषने स्वतः 16 वेळा चोरी केली आणि इतर आरोपींना 19 वेळा चोरीत मदत केली. म्हणजेच जवळपास 50 दिवसांच्या नोकरीच्या काळात तो एकूण 35 वेळा चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. एप्रिलमध्ये मनीषला कामावर घेतल्यानंतर आरोपींनी एकत्रितपणे मोठ्या रकमेवर हात साफ करण्यास सुरुवात केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

कारगिल, ऑपरेशन सिंदूर ते आयोध्या! राम मंदिर ट्रस्टचे नवे सीईओ निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रांचा प्रवास

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींकडून पोलिसांनी 79,85,493 रुपये जप्त केले आहेत. तर सर्व 8 आरोपींच्या बँक खात्यांमध्ये मिळून 98,30,000 रुपये जमा असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. निवृत्त बँक कर्मचारी सुभाष श्रीवास्तव यांची भूमिकाही तपासात समोर आली आहे. 25 आणि 30 मे रोजी झालेल्या चोरीत त्यांनी अविनाश शुक्लाला मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. 7 जानेवारी 2022 पासून देणगी पेटीत जमा होणारी रक्कम बँकेत जमा करण्याची जबाबदारी सुभाष यांच्याकडे होती. मोठ्या रकमेची चोरी करण्यासाठी आरोपींनी त्यांचा सहभाग घेतल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

दरम्यान, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र तपासात त्यांच्याविरोधात चोरीशी संबंधित पुरावे आढळले नसल्याने त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. हे तिघे आरोपपत्रातील आरोपी नसून साक्षीदारांच्या यादीत त्यांची नावे आहेत. देणगी चोरीप्रकरणी सर्वप्रथम एफआयआर दाखल करणारे कृष्ण मोहन हे पहिले साक्षीदार आहेत. याशिवाय कोतवाली निरीक्षक, राम जन्मभूमी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि अयोध्या पोलीस प्रमुख यांच्यासह एकूण 27 पोलीस कर्मचाऱ्यांचा साक्षीदारांमध्ये समावेश आहे.

Exit mobile version