‘छत्रपती शिवाजी महाराजांनाही गद्दारी मान्य नव्हती’; बंडखोरांवर टीका करताना खैरेंचं मोठं विधान

धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास, मराठवाड्यात शिवसेना रुजवण्यासाठी केलेला संघर्ष आणि पक्षातील फुटीमागील कारणांवर सविस्तर भाष्य केले.

Untitled Design (92)

Untitled Design (92)

Chandrakant Khaire’s major statement : शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी एका विशेष मुलाखतीत शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आजच्या राजकीय संघर्षापर्यंतचा प्रवास उलगडला. लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणी, धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास, मराठवाड्यात शिवसेना रुजवण्यासाठी केलेला संघर्ष आणि पक्षातील फुटीमागील कारणांवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सोडून गेलेले काही नेते आणि बंडखोरी करणाऱ्यांवर अत्यंत परखड शब्दांत टीका केली.

चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधातील बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पाहून ते शिवसेनेकडे आकर्षित झाले. ‘मार्मिक’ साप्ताहिक वाचत असताना त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल आदर निर्माण झाला आणि ते शिवसैनिक बनले. पुढे मराठवाड्यात शिवसेना वाढवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. संभाजीनगरमध्ये 8 जून 1995 रोजी शिवसेनेची अधिकृत स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण एक दिवसही पक्ष सोडलेला नाही, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना खैरे भावूक झाले. 1978 मध्ये मुंबईत निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी बाळासाहेबांना भेट घेतली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी प्रथम संभाजीनगरमध्ये शिवसेना उभी करा, मग मी तिथे येतो, असे सांगत त्यांच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद दिले होते. तो क्षण आजही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याचे खैरे यांनी सांगितले.

शिवसेना वाढवण्यासाठी आपण आणि सहकाऱ्यांनी मोठा संघर्ष केला असल्याचे सांगताना खैरे म्हणाले की, आंदोलनं, दंगली, पोलिस कारवाई, अटक, लॉकअप आणि तुरुंगवास यांचा सामना करत शिवसेना मराठवाड्यात रुजवली. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने गर्दी होत असे. त्या काळातील शिवसैनिकांचे समर्पण आणि निष्ठा आजही विसरता येणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना खैरे यांनी शिवसेनेतील फुटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत गद्दार असा उल्लेख केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात गद्दारांना क्षमा नाही असा संदेश देण्यात आला होता. मात्र, तोच संदेश देणारे काही लोक पुढे जाऊन शिवसेनेविरोधात उभे राहिले, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

तुकाराम मुंढेंची FDA मध्ये बदली झाली? आमदार विक्रम पाचपुतेंनी ‘तो’ किस्सा सांगितला…

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना खैरे म्हणाले की, शिवसेनेने त्यांना मोठी संधी दिली, पदे दिली, मान-सन्मान दिला. शिंदे हे माझ्यापेक्षा ज्युनियर होते. आनंद दिघे आणि मी अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केले. पक्षाने त्यांना सर्व काही दिले, तरी त्यांनी बंडखोरीचा मार्ग निवडला, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी काही खासदार आणि नेत्यांच्या पक्षत्यागाचाही उल्लेख केला. काही जणांबाबत आपल्याला कधीही अपेक्षा नव्हती की ते पक्ष सोडतील, असे सांगताना त्यांनी काही नेत्यांवर पैशाच्या मोहाला बळी पडल्याचा आरोप केला. “पैसा आणि सत्तेची मस्ती डोक्यात गेली की माणूस आपले विचार बदलतो,” असे ते म्हणाले.

मुलाखतीत खैरे यांनी छगन भुजबळ यांच्या बंडाची आठवणही सांगितली. 1992 मध्ये भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह आपण त्यांचा शोध घेण्यासाठी राज्यभर फिरत होतो, असा किस्सा त्यांनी सांगितला. त्या काळात शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांविषयी कार्यकर्त्यांमध्ये किती तीव्र भावना होत्या, याचेही त्यांनी वर्णन केले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मात्र खैरे यांनी त्यांची बाजू घेतली. बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिन्ही पिढ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी ठाकरे कुटुंबावरील आपली निष्ठा व्यक्त केली. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, या आरोपांबाबत बोलताना मोठा पक्ष आणि मोठी जबाबदारी सांभाळताना प्रत्येकाला वेळ देणे शक्य नसते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देत गद्दारीविरोधातील आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांना गद्दारी कधीच मान्य नव्हती. त्यामुळे मलाही गद्दारी मान्य नाही. पक्ष, विचार आणि नेतृत्वाशी प्रामाणिक राहणे हेच खऱ्या शिवसैनिकाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेला आज मोठे आव्हान असले तरी पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त करत खैरे यांनी शिवसैनिकांना संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले. अनेक दशकांच्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना त्यांनी पक्षातील फुटीमुळे झालेल्या वेदना मांडल्या, तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वावर आजही आपला पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले.

Exit mobile version