तुकाराम मुंढेंची FDA मध्ये बदली कशी झाली? आमदार विक्रम पाचपुतेंनी ‘तो’ किस्सा सांगितला…
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी बदली कशी झाली? याबाबत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले आहे.
Mla Vikram Pachpute : काही महिन्यांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर मुंढे यांनी राज्यभरात कारवाईचा धडाकाच सुरु केला आहे. बनावट पनीर आणि अॅनालॉग प्रकरणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सातत्याने आवाज उठवल्याचं दिसून आलं होतं. पनीरसह इतरही अनेक महत्वाच्या मुद्द्यावर पाचपुते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यानंतरच तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तुकाराम मुंढे यांची FDA विभागात कशी नियुक्ती झाली? याबाबतचा किस्सा आमदार विक्रम पाचपुते यांनी लेट्सअपशी बोलताना शेअर केला आहे.
विक्रम पाचपुेत म्हणाले, मतदारसंघातील कामानिमित्त दर मंगळवारी मी मुंबईला जातो. आश्वासन समितीची बैठकही असल्याने मी मंत्रालयात आलो होतो. त्याच दिवशी मंत्रिमंडळ बैठक असल्याने आम्ही दोन चार आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर गप्पा मारत थांबलो होतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पत्र घेऊन मी गेलो होतो. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांच्या दालनातून निरोप आला की बाहेर जेवढे आमदार आहेत, त्यांना आत पाठवून द्या. आम्ही आत गेलो, त्यावेळी तुकाराम मुंढे मुख्यमंत्री दालनातून बाहेर पडत होते. त्याचवेळी शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे दालनात आले. महेश शिंदे यांनीही एफडीएच्या संदर्भात खूप चांगले प्रश्न मांडले आहेत, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर माझ्याकडे पाहून एफडीए नीटच करतो आता… असे मुख्यमंत्री म्हणाले. या सगळ्याला साक्षीदार समाधान अवताडे, महेश शिंदे आणि मी असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं आहे.
अनेक दिवसांपासून मी बनावट पनीर आणि अॅनालॉगचा मुद्दा मांडत होतो. मतदारसंघातील कामांसाठी नेहमीच मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात भेट घेऊन प्रश्न मांडत असतो. आत्तापर्यंत मी बनावट पनीरचा मुद्दा फडणवीस यांच्याकडे आठ ते दहावेळा मांडला आहे. त्या दिवशीही मी फडणवीस यांच्याकडे हा विषय घेऊन गेलो होतो. त्या दिवशीही मी या विषयाचं गांभीर्य फडणवीस यांना समजावून सांगितलं. काहीही करून आपण मार्ग काढावा, असे मुख्यमंत्री महोदयांना मी आठ-दहा वेळा सांगितले. यादरम्यान राजेश नार्वेकर, श्रीधर डुबे-पाटील यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र ॲनालॉग पनीरचा मुद्दा किती गंभीर आहे, हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मी लक्षात आणून दिले. मुख्यमंत्री महोदयांनी देखील हा प्रश्न व्यवस्थित समजावून घेऊन योग्य माणसाकडे याची जबाबदारी दिली पाहिजे, असे विचार करून तुकाराम मुंढे यांची निवड केली, असे विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले.
दरम्यान, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे तरुण आमदार विक्रमसिंह पाचपुते त्यांच्या कामाने सध्या राज्यात चर्चेचा विषय राहिलेले आहेत. त्यांनी अॅनालॉग पनीर या संदर्भातील मुद्दा विधानसभेत मांडलेला होता. पनीरमध्ये भेसळ कशाप्रकारे होते हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी विधानसभेत केला. यासंदर्भातील पाठपुरावा देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेकदा केला. त्यानंतरच तुकाराम मुंढे यांची FDA विभागात बदली झाली आहे.