शाळेत घडली मन हेलावणारी घटना; शिक्षिकेच्या ओरडानंतर चिमुकल्याचा मृत्यू, सीसीटीव्ही व्हायरल
शिक्षिकेने केलेली ओरड आणि मारहाण सहन न झाल्याने अवघ्या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Young child dies after teacher scolds him : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. शाळेत गृहपाठ पूर्ण करून न आल्याच्या कारणावरून शिक्षिकेने केलेली ओरड आणि मारहाण सहन न झाल्याने अवघ्या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे शालेय परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रणय तेज असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो विशाखापट्टणममधील ‘लिटल गार्डन स्कूल’मध्ये शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी प्रणयने गृहपाठ पूर्ण केला नव्हता. याच कारणावरून वर्गातील शिक्षिकेने त्याला सर्व विद्यार्थ्यांसमोर उभे करून जाब विचारल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिक्षिकेने त्याला ओरडल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, वर्गात इतर विद्यार्थ्यांसोबत उभा असलेला प्रणय अत्यंत घाबरलेला दिसत आहे. शिक्षिकेच्या रागावण्यामुळे तो रडू लागल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर शिक्षिकेने त्याला कानशिलात लगावल्याचा दावा केला जात आहे. मार बसल्यानंतर काही क्षणांतच प्रणयचा तोल गेला आणि तो थेट शिक्षिकेजवळ कोसळला. हा प्रकार पाहून वर्गातील इतर विद्यार्थीही घाबरून गेले.
టీచర్కు భయపడి కుప్పకూలి ఎల్కేజీ విద్యార్థి మృతి
విశాఖపట్నంలో దారుణ ఘటన
లిటిల్ గార్డెన్ స్కూల్లో హోంవర్క్ చేయలేదని టీచర్ కొట్టడంతో భయపడి గుక్కపెట్టి ఏడుస్తూ, కుప్పకూలి టీచర్ మీద పడిపోయిన ఎల్కేజీ విద్యార్థి ప్రణయ్ తేజ్ (6)
చికిత్స నిమిత్తం ఆసుపత్రికి తరలించగా, అప్పటికే… pic.twitter.com/KW8umxWCAu
— Telugu Scribe (@TeluguScribe) August 20, 2026
घटना लक्षात येताच शाळा प्रशासनाने तातडीने मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, तीव्र भीती आणि मानसिक धक्क्यामुळे मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे आई-वडील, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमा झाले. संतप्त पालकांनी शाळेसमोर निदर्शने करत संबंधित शिक्षिकेवर आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली. शिक्षिकेच्या वागणुकीमुळेच आपल्या मुलाचा जीव गेला, असा गंभीर आरोप प्रणयच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज, शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांची माहिती तपासली जात आहे. संबंधित शिक्षिकेची चौकशी सुरू असून तिची भूमिका नेमकी काय होती, याचाही तपास केला जात आहे.
शिवसेना-धनुष्यबाण वादात ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत मोठ्या घडामोडी
या घटनेमुळे शाळांमधील शारीरिक शिक्षा, विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव आणि शिक्षकांच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, लहान मुलांशी संवाद साधताना अत्यंत संवेदनशीलता आणि संयम आवश्यक असतो. विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचे समुपदेशन करणे आणि सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
विशाखापट्टणममधील या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा शाळेतच झालेला मृत्यू अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. आता या प्रकरणातील तपासातून नेमके सत्य काय समोर येते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.