नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; परीक्षा प्रक्रियेशी संबंधित प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक
तपासादरम्यान त्या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.
Professor Manisha Mandhare in CBI custody : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आता पुण्याचा कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने पुण्यातील जीवशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अटक केली आहे. परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध असलेल्या मांढरे या ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तपासादरम्यान त्या पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर सीबीआयने त्यांना दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.
सीबीआयच्या माहितीनुसार, प्राध्यापिका मनीषा मांढरे यांचा वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे हिने काही विद्यार्थ्यांना तिच्या घरी बोलावून विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित केले होते. या वर्गात प्रा. मांढरे यांनी विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सांगितल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या मार्गदर्शन वर्गात शिकवण्यात आलेले अनेक प्रश्न प्रत्यक्ष ‘नीट’ परीक्षेत आल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेले रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना देखील सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. कुलकर्णी हे देखील परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. त्यांच्या चौकशीतूनच मनीषा मांढरे यांचं नाव समोर आलं. त्यानंतर सीबीआयने कारवाईचा वेग वाढवत मांढरे यांना अटक केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे याला देखील सीबीआयने ताब्यात घेतले आहे. लोखंडे हा पुण्यातील काही संशयितांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातील ब्युटी पार्लरचालक मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतले होते. पुढे धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांना अटक करण्यात आली.
अकरा लढती, आठ संघ अन् प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच ! नेमकी समीकरण आहे तरी कसं ?
या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्राबरोबरच राजस्थान आणि हरियाणापर्यंत पोहोचले आहेत. जयपूरमधील तीन, गुरुग्राममधील एक आणि नाशिकमधील एका आरोपीसह आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इतर इलेकट्रोनिक उपकरणे जप्त केली आहेत.
या प्रकरणातील पाच आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांनतर त्यांची ट्रान्झिट रिमांड घेऊन दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात नेले जाणार असल्याची माहिती तपस यंत्रणेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेली मनीषा वाघमारे ही व्यवसायाने ब्युटी पार्लरचालक असून तिचे पती दंतवैद्यक तज्ज्ञ आहेत. बिबवेवाडी परिसरात त्यांचे रुग्णालय आहे. सीबीआयच्या पथकाने या रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता रुग्णालय बंद असल्याचे आढळून आले. आता वाघमारे यांच्या डॉक्टर पतीची देखील या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षा प्रक्रीयेशी संबंधित व्यक्तींचाच या रॅकेटमध्ये सहभाग उघड होत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.