स्टॅलिन यांच्या घराबाहेर ‘काँग्रेस गो बॅक’चे फलक! सोनिया-राहुल-खर्गे चेन्नईत दाखल, INDIA आघाडीत मोठी फूट?

मतदारसंघ फेररचना विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद वाढले असतानाच स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसविरोधी निदर्शने.

News Photo   2026 11 29T172929.985

Congress Go Back Protest in Chennai

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी प्रस्तावित मतदारसंघ फेररचना विधेयकावरून इंडिया आघाडीत राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या विधेयकाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का बसण्याची शक्यता आहे. स्टॅलिन यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी चेन्नई गाठले आहे. मात्र, या भेटीपूर्वीच स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसविरोधी घोषणाबाजी सुरू झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक वरिष्ठ नेते चेन्नईत दाखल झाले आहेत. मतदारसंघ फेररचना विधेयकावर विरोधकांची एकत्रित भूमिका निश्चित करण्यासाठी हे शिष्टमंडळ स्टॅलिन यांच्याशी चर्चा करणार आहे. या दौऱ्यात व्ही. डी. सतीशन, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचाही सहभाग असल्याची माहिती आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांचे आगमन होण्यापूर्वीच स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर द्रमुक कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली. काही कार्यकर्त्यांनी हातात ‘काँग्रेस गो बॅक’चे फलक घेत काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या आंदोलनामुळे नेत्यांच्या भेटीपूर्वीच चेन्नईतील राजकीय वातावरण तापले आहे.

हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्यांना कळतं, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा खेळ राज ठाकरेंनी आधीच ओळखला होता?

विशेष म्हणजे, स्टॅलिन यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटण्यास सहमती दर्शवली असली तरी मतदारसंघ फेररचना विधेयकाबाबतची त्यांची भूमिका बदलण्याची शक्यता कमी असल्याचे द्रमुकच्या वर्तुळातून सांगितले जात आहे. तामिळनाडूच्या राजकीय आणि प्रादेशिक हिताचा विचार करूनच पक्षाने ही भूमिका घेतल्याचे द्रमुककडून स्पष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते स्टॅलिन यांची मनधरणी करण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत स्टॅलिन यांना या विधेयकाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. प्रस्तावित फेररचनेमुळे देशातील लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. सोमवारी सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विधेयकाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आता काँग्रेस नेतृत्वासमोर आहे.

दरम्यान, मतदारसंघ फेररचना म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा तसेच जागांच्या संख्येची नव्याने निश्चिती करण्याची प्रक्रिया होय. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या 543 वरून कमाल 850 पर्यंत वाढवण्याचा विचार आहे. या बदलामुळे महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा होईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे राज्यांमधील राजकीय प्रतिनिधित्वाचे संतुलन बिघडण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version