Establishment of cancer diagnosis centers : ग्रामीण भागातील कर्करुग्णांना अत्याधुनिक उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. उपचारांचा वाढता खर्च, प्रवासाचा त्रास आणि वेळेवर सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कर्करुग्णांना स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाकेअर अंतर्गत नागपूर येथे नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट या उपकंपनीच्या स्थापनेसाठी महाकेअर संचालक मंडळाची पहिली बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीत कर्करोग निदान आणि उपचार व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
नागपूरमध्ये हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट उभारण्यामागे विदर्भातील रुग्णांना अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा त्यांच्या जवळच्या परिसरात उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. सायक्लोट्रॉन तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक असणाऱ्या रेडिओफार्मास्युटिकल्सचे स्थानिक पातळीवर उत्पादन होणार असल्याने उपचार प्रक्रियेला वेग मिळणार आहे. यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
बैठकीत राज्यातील कर्करोग निर्मूलन मोहिमेला गती देण्यासाठी महाकेअर कंपनीच्या कॉर्पस निधीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारणे आणि स्वीकारणे, महाकेअरच्या कार्यालयासाठी मुंबईतील जी.टी. रुग्णालयाच्या इमारतीत जागा उपलब्ध करून देणे, कंपनीचे लेखापरीक्षक आणि कंपनी सचिवांची नियुक्ती करणे तसेच तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करणे या महत्त्वाच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून व्यक्त केली वेदना; शिक्षकाने मुलांसह संपवलं आयुष्य, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत राज्यातील रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. कर्करोगाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी संशोधन, निदान आणि उपचार यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केली.
यावेळी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्यात तांत्रिक सहकार्याचा सामंजस्य करारही करण्यात आला. टाटा मेमोरियलचे नवीन खत्री आणि महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या सहकार्यामुळे राज्यातील कर्करोग उपचार व्यवस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे.
महाकेअरने तयार केलेल्या आराखड्यानुसार नागपूरसह मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथेही अशाच स्वरूपाची केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो कर्करुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असून त्यांच्या जिल्ह्याजवळच अत्याधुनिक निदान आणि उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सचिव विकासचंद्र रस्तोगी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, महाकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार डॉ. कैलाश शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करुग्णांसाठी हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रातील मोठा टप्पा मानला जात असून, राज्यात कर्करोगाविरोधातील लढ्याला यामुळे नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
