मृत्यूपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमधून व्यक्त केली वेदना; शिक्षकाने मुलांसह संपवलं आयुष्य, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांना सोबत घेत कार थेट गोदावरी नदीपात्रात घालून जीवनयात्रा संपवली.

  • Written By: Published:
Untitled Design 46

Teacher ends life along with children : एका वडिलांनी आपल्या दोन चिमुकल्या लेकरांसह मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना नांदेडमध्ये घडली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी दोन मुलांना सोबत घेत कार थेट गोदावरी नदीपात्रात घालून जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांनी आपली व्यथा मांडली होती. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

ही घटना नांदेड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी ठरली आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात कार घालून त्यांनी जीवन संपवल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर काही संदेश ठेवत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. हदगावचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी स्टेटसमध्ये नमूद केल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर; लाखो विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय करिअरचा निर्णायक टप्पा पार

यानंतर सुनील मोरे यांनी आपल्या मुलगी सारा आणि मुलगा सुमित यांना सोबत घेत कारने मुदखेड तालुक्यातील आमदुरा परिसर गाठला. तेथे त्यांनी कार थेट गोदावरी नदीपात्रात उतरवली. कार पाण्यात अडकल्यानंतर तिघांचाही गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने नदीपात्रातून कार बाहेर काढली. त्यानंतर कारमधून सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

भोकर तालुक्यातील बेंबर गावचे मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी आपल्या दोन निष्पाप मुलांसह आयुष्य संपवल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण काय, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, एका शिक्षकाने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह इतके टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून शिक्षण क्षेत्रातूनही तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील सत्य समोर यावे आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

follow us