अटकेतील माजी जिल्हाधिकारी पाठक यांचं भांडं फुटणार! लातूरात पोलिसांची झाडाझडती, काय-काय सापडलं?

बीडचे माजी जिल्हाधिकारी पाठक यांची केवळ तांत्रिक पुरावेच नव्हे, तर आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी केली जात आहे.

News Photo   2026 05 10T161324.236

अटकेतील माजी जिल्हाधिकारी पाठक यांचं भांडं फुटणार! लातूरात पोलिसांची झाडाझडती, काय-काय सापडलं?

बीड जिल्ह्यात गाजलेल्या २४९ कोटींच्या (Beed) अतिरिक्त मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बीड पोलिसांनी शनिवारी पाठक यांना तपासासाठी त्यांच्या लातूर येथील निवासस्थानी नेले होते. तेथे तासनतास चाललेल्या झडतीमध्ये पोलिसांनी पाठक यांचा लॅपटॉप, टॅब, मोबाईल आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अविनाश पाठक यांनी जप्त केलेल्या लॅपटॉपचा वापर करून ‘बॅकडेटेड’ (जुन्या तारखेचे) आदेश तयार केल्याचा दाट संशय आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, पाठक यांनी तब्बल १५४ प्रकरणांत लवादाचे वाढीव मावेजाचे आदेश काढल्याचे समोर आले आहे.

या लॅपटॉपची आता मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार असून, त्यातील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.
हस्ताक्षर तज्ज्ञांच्या ७ महिन्यांच्या तपासानंतर पाठक यांचे हस्ताक्षर आदेशांवरील स्वाक्षरीशी जुळल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. आता पोलीस पाठक यांच्या आवाजाचे नमुनेही घेणार आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा घोटाळा सिद्ध करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

केवळ तांत्रिक पुरावेच नव्हे, तर आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी केली जात आहे. घोटाळ्याच्या काळात पाठक यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांवर काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत का? तसेच त्यांची मालमत्ता किती वाढली? याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या महसूल विभागाने या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल बीड पोलिसांकडून मागवला असून, प्रशासकीय पातळीवरही हालचालींना वेग आला आहे.

Exit mobile version