Markandey Katju : सर्वोच्च न्यायालयाचे (Vote) माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी भारतातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण आयुष्यात कधीही मतदान केलेलं नसल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे, तर भविष्यातही मतदान करण्याचा आपला विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या महिन्यात आपण 80 वर्षांचे झालो, असं सांगत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यात काहीच अर्थ नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
भारतातील निवडणूक व्यवस्था व्यावहारिकदृष्ट्या अपयशी ठरल्याचा दावा काटजू यांनी मुलाखतीत केला. त्यांच्या मते, देशातील 90 ते 95 टक्के मतदार उमेदवाराची क्षमता, प्रामाणिकपणा किंवा शैक्षणिक पात्रता पाहून मतदान करत नाहीत. त्याऐवजी जात आणि धर्माच्या आधारावर मतदान केलं जातं, असा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या या भूमिकेमुळे निवडणूक प्रक्रियेचा मूळ उद्देशच बाजूला पडत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
लोकशाही व्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील नागरिकांची विचारसरणी आधुनिक आणि विवेकपूर्ण असणं आवश्यक असल्याचं काटजू यांनी सांगितलं. देशातून जातीयवाद आणि सांप्रदायिकता संपल्याशिवाय निवडणुकांना अर्थ उरणार नाही, असं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि कथित मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष तसेच विद्यार्थी संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. केवळ जातीच्या आधारावर मतदान होत असेल, तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होतात, असं ते म्हणाले.
निवडणुकीतून सत्तेवर येणाऱ्या नेत्यांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात अपेक्षित बदल होत नसल्याची टीकाही काटजू यांनी केली. नितीश कुमार असोत किंवा तेजस्वी यादव अथवा अन्य कोणताही नेता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला, तरी गरिबी, भूक आणि बेरोजगारी यांसारख्या मूलभूत प्रश्नांमध्ये सुधारणा होत नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे केवळ सत्तांतर घडून उपयोग नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष बदल होणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा त्यांच्या वक्तव्यातून पुढे आला.
