दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajitdada) आठवणींना उजाळा देताना मंत्री गुलाबराव पाटील भावूक झाले. जळगाव जिल्हा बँकेच्या आवारात अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी पाटील यांनी शेरोशायरी सादर करत अजितदादांना आदरांजली वाहिली. अजित पवार यांचं निधन ही केवळ पवार कुटुंबाची हानी नसून संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“इतना टूटा हु कि छुने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुवा देंगे तो मर जाऊंगा. फुल रह जायेंगे गुलजार मे यादों की नजर, मै तो खुशबू हू फिजाहो मे बिखर जाऊंगा,” अशा शेरोशायरीतून गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार विधानसभेत अनेकदा त्यांच्या आवाजाचा उल्लेख करायचे. “गुलाब, तुला माइकची गरज नाही,” असं ते म्हणायचे, अशी आठवणही पाटील यांनी सांगितली. अजितदादांना नियतीनं सावरण्याची किंवा संधी मिळण्याची वेळही दिली नाही, अवघ्या दोन मिनिटांत असं दुर्दैवी घडलं, असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलं.
अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, दुसरं कोणतंही खातं नको; भुजबळ स्पष्टच बोलले!
अजित पवार यांच्या दिलदार स्वभावाचा किस्साही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारामतीच्या विकासकामांसाठी 300 कोटी रुपयांच्या मंजुरीचा विषय आला होता. त्यावेळी आपण स्वतःच्या भागातील कामांसाठी 40 ते 45 कोटी रुपये मागितले असता विरोध केला जातो, अशी नाराजी अजितदादांकडे व्यक्त केली होती. त्यावर “तुलाही पैसे देतो,” असं अजित पवार म्हणाले होते. बारामतीच्या कामात आपण आडकाठी आणल्यानंतरही त्यांनी आपल्याला निधी दिला, असं सांगत पाटील यांनी अजितदादांच्या उदार स्वभावाचं कौतुक केलं.
अजित पवार हे निधीच्या बाबतीत शिस्त पाळणारे आणि काटकसरी असले, तरी महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेताना त्यांची भूमिका महत्त्वाची असायची, असंही पाटील यांनी नमूद केलं. त्यांच्या कामाची पद्धत, स्पष्ट बोलण्याची शैली आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंध यामुळे ते कायम लक्षात राहतील, असं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील, अशा भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या.
