प्रफुल्लजी, आता भेट होणार नाही; आदल्या रात्रीच अजित दादा बोलून गेले होते

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातून बाहेर पडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली.

  • Written By: Published:
Untitled Design (335)

Detailed information about the incident was given. Praful Patel said : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीत विमान अपघातात दु:खद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळाला जबर धक्का बसला आहे. आज रात्री अजित पवार यांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी येथे येऊन आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. अंत्यदर्शनानंतर पार्थिव पुढील वैद्यकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेसाठी पुन्हा बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातून बाहेर पडताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत अपघातानंतर घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास बारामती विमानतळावरून मला फोन आला. एक विमान कोसळलं आहे, त्यात स्फोट झाला आहे आणि त्या विमानात अजित दादा आहेत, अशी माहिती देण्यात आली. दोन मिनिटं आम्हाला काहीच सुचत नव्हतं की नेमकं काय झालं आहे. सकाळी धुकं होतं, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होती.’

ते पुढे म्हणाले, ‘माहितीनुसार, विमानाने दोन वेळा विमानतळावर घिरट्या मारल्या. तिसऱ्यांदा पायलटने सांगितलं की, आता मला धावपट्टी दिसते आहे, त्यानंतर लँडिंगची परवानगी देण्यात आली. त्यानंतर जे घडलं, ते सर्वांना माहीत आहे.’ या घटनेवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘आम्ही त्यांच्या पार्थिवाला नमन करून आलो, पण अजूनही विश्वास बसत नाही. कारण काल रात्रीच साडेआठच्या सुमारास अजित दादांचा मला फोन आला होता. आमचं बोलणं झालं. शेवटी ते एवढंच म्हणाले की, ‘प्रफुल्ल, आता भेट होणार नाही, कारण मी आठ-दहा दिवस बाहेर आहे.’ आज खरंच तसं घडेल, याची कुणालाच कल्पना नव्हती.’

दरम्यान, या दु:खद घटनेवर काही ठिकाणी राजकारण केलं जात असल्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले,’ही अत्यंत दु:खाची घटना आहे. यात कुठेही राजकारण असू नये. जे काही घडलं आहे, त्याची सत्य माहिती चौकशीतून समोर येईल. अशा वेळी संयम ठेवणं गरजेचं आहे.’ अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि प्रभावी नेता गमावला असून राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

follow us