हवामान विभागाचा अंदाज चुकला? मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी

कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असून मुंबई आणि पुण्यातही पावसाच्या सरी बरसत आहेत.

Untitled Design   2026 09 19T085114.856

Untitled Design 2026 09 19T085114.856

Heavy rainfall in many parts of the state : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज असतानाच काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असून मुंबई आणि पुण्यातही पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांत शेतीपिके संकटात सापडली आहेत. अशात काही ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा विस्कळीत झाला असून कमी दाबाची प्रणाली निवळल्यानंतर गुजरात परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत अरबी समुद्राच्या दिशेने कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू असून शुक्रवारी रात्रीही शहराच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून पवईसह आसपासच्या भागांत हलक्या सरी सुरू आहेत. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे.

जरांगेंनी एकनाथ शिंदेंच्या चारित्र्यहननाची सुपारी घेतली, संजय लाखे पाटलांचा गंभीर आरोप

दरम्यान, तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यातही पावसाने पुनरागमन केले. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. विशेषतः शेतात उभ्या असलेल्या धानपिकांना पाण्याची गरज असताना झालेला हा पाऊस पिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे तापमानातही घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, विदर्भातील अनेक भागांत अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर हलक्या पावसाची शक्यता असली तरी तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत मॉन्सूनच्या पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतीपिकांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version