जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू; समितीकडून क्लिपची मागणी, जरांगेंनी घातली अट

500 Crore Audio Clip : 500 कोटींच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात जरांगे पाटील यांनी तपास यंत्रणेसमोर महत्त्वाची भूमिका मांडली आहे.

News Photo   2026 11 04T152016.754

Jarange Patil Audio Clip

Jarange Patil Audio Clip : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याची आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही रक्कम देण्यात आल्याची चर्चा असल्याचा दावा करण्यात आला होता. या क्लिपचा उल्लेख करत जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

दरम्यान, भाजपमधील काही नेत्यांनी संबंधित ऑडिओ क्लिप एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण कोणाकडून पैसे घेतले नाहीत आणि कोणालाही पैसे दिले नाहीत, अशी भूमिका मांडली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. आता या पथकाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली असून मनोज जरांगे पाटील यांच्याशीही संपर्क साधला आहे.

चौकशी समितीने मनोज जरांगे पाटील यांना पत्र पाठवून संबंधित ऑडिओ क्लिप उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी तपास यंत्रणेला आवश्यक असलेली सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली. समिती जे काही मागेल ते देऊ, ऑडिओ क्लिपही सुपूर्द करू आणि ती नेमकी कुठून मिळाली, याचा स्रोतदेखील सांगू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही क्लिप तपास यंत्रणेकडे दिल्यानंतर तिची सत्यता आणि त्यामागील संपूर्ण माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागले आहे.

मात्र, ऑडिओ क्लिपचा स्रोत सांगण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. क्लिप उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दोन्ही नेत्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेची खात्री मिळाल्यानंतरच क्लिपचा स्रोत सांगण्याची तयारी असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सरकार आणि एसआयटी यावर काय भूमिका घेतात, तसेच या कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version