Jhandu Kumar’s story isn’t just limited : कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. पॅरा पॉवरलिफ्टिंग, स्विमिंग, बॉक्सिंग आणि लॉन बॉल्स या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवले. यामध्ये बिहारच्या 28 वर्षीय झंडू कुमारने पुरुषांच्या हेव्हीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकत भारताच्या पदक खात्याची सुरूवात केली.
झंडू कुमारने स्पर्धेत 181 किलो आणि 190 किलो वजन यशस्वीरीत्या उचलत 130.9 गुणांची कमाई केली. त्याचा 196 किलो वजन उचलण्याचा शेवटचा प्रयत्न मात्र अपूर्ण राहिला. या स्पर्धेत नायजेरियाच्या इदतीस रिलूवानने 132.8 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर मॅथ्यू हार्डिंगने 131 गुणांसह रौप्य्पादक मिळवले. मात्र झंडू कुमारची ही कामगिरी फक्त पदकापुरती मर्यादित नाही. त्यामागे संघर्ष, जिद्द आणि चिकाटीची प्रेरणादायी कहाणी दडलेली आहे. लहानपणी पोलिओचा सामना करावा लागलेल्या झंडूचा जन्म एका साध्या भाजी विक्रेत्याच्या कुटुंबात झाला. कुटुंबाला आर्थिक हातभार देण्यासाठी त्याने बालपणापासूनच भाजी विकण्याचे काम केले. पुढे उदरनिर्वाहासाठी ई-रिक्षा आणि ऑटो-रिक्षा चालवून देखील त्याने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरू ठेवला.
खेळातील प्रगतीसाठी त्याने अनेक त्याग केले. 2023 मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवध्यक निधी उभारता यावा म्हणून त्याने स्वतःची गाडी विकण्याचा कठोर निर्णय घेतला होता. सुरूवातीला झंडू पॅरा ऍथलेटिक्समध्ये सहभागी होत होता. शार्पशुट आणि डिस्कस थ्रो प्रकारात त्याने जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली. मात्र प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर त्याने 2022 मध्ये पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्याच्या कारकिर्दीने वेगळीच दिशा घेतली.
नीट आंदोलनावरील पोस्टमुळे सलमान खान ट्रोल; जो डर गया वो मर गया म्हणत दिले उत्तर
कोलकाता येथे झालेल्या पहिल्याच स्पर्धेत रौप्य्पादक जिंकून झंडूने आपली क्षमता दाखवून दिली. त्यानंतर 2025 मध्ये पुरुषांच्या 72 किलो वजनी गटात राष्ट्रीय विक्रम मोडून त्याने नवा इतिहास रचला. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 2025 किलो वजन उचलून त्याने जुना विक्रम मोडला, तर काही दिवसांनंतर नवी दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये 206 किलो वजन उचलत स्वतःचच विक्रम सुधारला.
झंडू कुमारने यापूर्वी वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग वल्ड कप आणि एशिया-ओशियन ओपन चॅम्पियनशिपमध्ये देखील कांस्यपदके जिंकली आहेत. तसेच वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली आहे. पोलिओ, गरिबी आणि आर्थिक अडचणींवर मात करत झंडू कुमारने मिळवलेले हे यश केवळ त्याच्या वैयक्तिक संघर्षाचे फळ नसून देशातील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे कांस्यपदक त्याच्या मेहनतीला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे.
