CJI Surya Kant : काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असून यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता केरळ काँग्रेसने मोठी मागणी करत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे देशातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जर कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे त्यांचे काम नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी हे काम सांभाळू शकेल अशी दुसरी व्यक्ती शोधली जाऊ शकते असं केरळ काँग्रेसने म्हटलं आहे.
दिल्लीतील (Delhi) अलीकडील आंदोलनांमुळे निर्माण झालेली परिस्थिती ही कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित असल्याने ती आपल्या अधिकारक्षेत्रात येत नाही, असे सरन्यायाधीशांनी म्हटल्यानंतर केरळ काँग्रेसने (Kerala Congress) ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेची एक पोस्ट शेअर करत म्हटले की, “प्रिय सूर्यकांत, जर कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे तुमचे काम नसेल, तर त्वरित राजीनामा द्या. तुमच्या जागी हे काम सांभाळू शकेल अशी दुसरी व्यक्ती आम्ही शोधू.
सरन्यायाधीश काय म्हणाले?
दिल्लीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (National Human Rights Commission) 33 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत (CJI Surya Kant) पत्रकारांशी बोलत होते. दिल्लीतील अलीकडील आंदोलने आणि त्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांबाबत विचारले असता, त्यांनी हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही असं म्हटलं होते.
Dear Surya Kant,
If law and order is not your domain, resign now. We will find your replacement who can handle it. https://t.co/actjR9kOHs
— Congress Kerala (@INCKerala) October 12, 2026
तर दुसरीकडे ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या निषेध मोर्चाबाबत आणि त्यांना भेटण्याच्या विनंतीबाबत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. मात्र, निवडणुकीतील अनियमिततेच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना खाजगीत भेटण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी नेत्यांना औपचारिक याचिका दाखल करून न्यायालयाकडे दाद मागण्याचा सल्ला दिला आणि नमूद केले की या प्रकरणावर न्यायालयात आधीच सुनावणी सुरू आहे.
