शिरूरमधील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा तापला; महेबुब शेख यांची थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

Shirur Fake Voter Registration : शिरूरमधील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा आता राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे.

News Photo   2026 11 06T200640.795

Shirur Fake Voter Registration

Shirur Fake Voter Registration : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष आणि प्रवक्ते महेबुब शेख यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेत शिरूर शहरातील बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी बनावट पीटीआर, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे नवीन मतदार नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सविस्तर तक्रार आयुक्तांकडे केली. तसेच, या प्रकारासंदर्भातील पुरावे आणि नोंदणीची पद्धतही त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

शिरूर शहरात नवीन मतदार नोंदणी करताना बनावट कागदपत्रांचा वापर करून मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यात आल्याचा दावा महेबुब शेख यांनी केला. या प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या आणि त्यांचा वापर करून बेकायदेशीर नोंदणी करणाऱ्या संबंधित व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दोषींविरोधात गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली.

तर रेशन, पेन्शन आणि घरकुलाचा लाभही जाणार? राहुल गांधींचा केंद्र सरकारच्या नव्या निर्णयावरून हल्लाबोल

या तक्रारीवर बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी, ज्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई आपण करू, असे आश्वासन दिल्याचे महेबुब शेख यांनी सांगितले. याशिवाय शिरूरचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी दबावाखाली राहून चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी आयुक्तांसमोर मांडला. या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

मतदार यादी ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधार असून बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी होणे ही गंभीर बाब असल्याचे महेबुब शेख यांनी म्हटले आहे. शिरूरमधील या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version