Major flood in the Indrayani River at Alandi : इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून आळंदी शहराला महापुराचा फटका बसला आहे. नदी दोन्ही काठांनी तुडुंब भरून वाहत असून नदीलगतच्या घाटांवर आणि परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने सोमवारी पहाटेपासून नदीवरील चारही प्रमुख पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
रविवारी सकाळपासून इंद्रायणीची पाणीपातळी सातत्याने वाढत होती. सायंकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली. लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसासह धरणातून नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणीने रौद्र रूप धारण केले आहे. रविवारी पहाटेच सिद्धबेट आणि गरुडस्तंभ परिसरातील पुलांवर पाणी आले होते. त्यानंतर पीएमपीएल बस स्थानकाजवळील पुलालाही पाण्याने स्पर्श केला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा मुख्य पूल, सिद्धबेट परिसरातील पूल आणि पीएमपीएल बस स्थानकाशेजारील नवीन पूल अशा चारही पुलांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली आहे. दुपारनंतर नवीन पुलालाही पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने तोदेखील पूर्णपणे सील करण्यात आला. परिणामी शहराकडे येणारी-जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Mumbai-Pune Trains : पावसाचा मुंबई-पुणे रेल्वेला फटका; अनेक गाड्या रद्द, काहींचे रूट चेंज
महापुराचा फटका नदीलगतच्या अनेक भागांना बसला आहे. भक्त पुंडलिक मंदिर परिसर, घाटाशेजारील काही दुकाने, वाहनतळ, हरी हरेंद्र मठ, देविदास धर्मशाळा, भराव रस्ता, ज्ञानेश्वरी मंदिर परिसर तसेच शनी मंदिरालगतच्या भागात पुराचे पाणी शिरले आहे. आषाढी वारीसाठी घाटावर उभारण्यात आलेल्या बदल कक्षांनाही पुराच्या पाण्याने वाहून नेले असून तात्पुरती स्वच्छतागृहेही पाण्याखाली गेली आहेत.
भाविक आणि नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नगरपरिषद चौक, महाराष्ट्र बँक परिसर, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान तसेच विश्वशांती केंद्र हवेली बाजू घाट आदी ठिकाणी लाकडी बांबू आणि लोखंडी पत्रे लावून मार्ग बंद केले आहेत. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नदीकाठावरील दुकानेही खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत.
पावसाचा जोर कायम असल्याने इंद्रायणी नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आणि भाविकांनी महापुराच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी भीमा नरके यांनी केले आहे.
