गुन्हेगारांची यादी वाचावी तशी कीर्तनकारांची नावे घेतली, आमदार संग्राम जगतापांचं संग्राम भंडारेंना उघड समर्थन
विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्याचा घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या कृतीच उघडपणे समर्थन केले आहे.
MLA Sangram Jagtap’s open support for Sangram Bhandare : वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा आणि राजकारण यांचा संगम असलेल्या एका वादग्रस्त घटनेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्याचा घटनेनंतर आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले असून, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या कृतीच उघडपणे समर्थन केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी भंडारे यांचे अभिमानदं करत लवांडे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका देखील केली आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, विकास लवांडे यांनी ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी नावे घेतली, ती पद्धत अत्यंत चुकीची होती. जणू काही गुन्हेगारांची यादी वाचावी, अशा स्वरूपात कीर्तनकारांवर आरोप केले. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे संग्राम भंडारे यांनी दिलेली प्रतिक्रिया योग्यच आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी पत्रकार परिषद घेत वारकरी संप्रदायात घुसखोर शिरल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कीर्तनकारांनी नवे घेत समाजात द्वेष आणि दिशाभूल करणारे विचार पसरवले जात असल्याचा दावा केला होता. या यादीत कीर्तनकार संग्राम भंडारे यांचे देखील नाव असल्याने वाद अधिकच चिघळला.
याच पार्श्वभूमीवर पुण्याजवळ विकास लवांडे यांच्या वाहनाला अडवून त्यांच्यावर काली शाई फेकण्यात आली. या घटनेत स्वतः संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचा संपूर्ण व्हिडिओ चित्रित केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये लवांडे यांच्याशी धक्काबुक्की होत असल्याचे देखील दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
मध्य प्रदेशातील कुख्यात गुंडाशी राम शिंदेंचा घरोबा? रोहित पवारांच्या पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ
घटनेनंतर विकास लवांडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. माझ्यावर केवळ शाई फेकली नाही, तर विचार मांडण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आला आहे, असे म्हणत त्यांनी थेट संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सध्या ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
या संपूर्ण घटनेमुळे राज्यातील राजकीय आणि धार्मिक वातावरण ढवळून निघाले आहे. एका बाजूला वारकरी संप्रदायाचा अपमान झाल्याचा आरोप करत भंडारे समर्थक आक्रमक झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी कायदा हातात घेण्याच्या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. राजकीय वर्तुळात देखील या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काहींनी आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावर टीका करत लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे हिंसक किंवा आकर्ममक कृतीचे समर्थन करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
तर भंडारे समर्थक मात्र वारकरी परंपरेचा अपमान करणाऱ्यांना उत्तर मिळाले, अशी भूमिका घेत आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून व्हायरल व्हिडीओची पडताळणी केली जात असून, संबंधितांच्या जबाबांची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात पुढे कोणावर गुन्हा दाखल होणार आणि राजकीय व धार्मिक स्तरावर या वादाचे पडसाद किती उमटणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.