Major gutkha smuggling racket in Bhiwandi : राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला जात आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासन आणि नारपोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 57 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित कमला पसंद आणि राजश्री पण मसाल्याचा साठा तसेच त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणार टेम्पो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लियाकत साबीर अली याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील काल्हेर येथील अरिहंत कंपाउंड परिसरातून टाटा टेम्पोच्य माध्यमातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पण मसाल्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत नारपोली पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्तपणे संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी संशयित टाटा टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.
पथकाने घटनास्थळावरून कमला पसंद आणि राजश्री पण मसाल्याचा तब्बल 42 लाख 96 हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. याशिवाय प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करण्याऐवजी वापरण्यात आलेला 15 लाख रुपये किमतीचा टाटा टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला. अशा प्रकारे या संयुक्त कारवाईत एकूण 57 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळाचे संकेत, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!
याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लियाकत साबीर अली याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रतिबंधित गुटख्याचा हा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता, तो कोणाला पुरवण्यात येणार होता आणि या अवैध वाहतुकीमागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
राज्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने मागील तीन महिन्यांत विविध ठिकाणी कारवाया करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला आहे. भिवंडीतील ही कारवाईदेखील त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात आहे. मात्र, केवळ साठा जप्त करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या अवैध व्यवसायामागील पुरवठा साखळी, साठवणूकदार आणि वितरकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
या मोठ्या कारवाईमुळे भिवंडी परिसरातील प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर प्रशासनाचा वचक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.
