तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर बनवलं, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा सुपरस्टारच्या मुलाबद्दल धक्कादायक खुलासा

आर्यन खान प्रकरणाच्या एसआयटी पथकाचे नेतृत्व करणारे निवृत्त IPS अधिकारी संजय कुमार सिंह यांनी आपल्या नव्या पुस्तकातून एक प्रसंग सांगितला आहे.

Untitled Design   2026 11 29T091509.292

Untitled Design 2026 11 29T091509.292

Major revelation from the book ‘Code of Honor’ : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. केवळ शाहरुखच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांबद्दलही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. मात्र, 2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे शाहरुख खानच्या कुटुंबालाही मोठ्या मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

आर्यन खान प्रकरणाच्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्व करणारे निवृत्त IPS अधिकारी संजय कुमार सिंह यांनी आपल्या नव्या पुस्तकातून चौकशीदरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, चौकशीदरम्यान एका बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा सतत रडत होता. संजय कुमार सिंह यांनी आपल्या कोड ऑफ ऑनर या पुस्तकात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पुस्तकात संबंधित सेलिब्रिटीच्या मुलाचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही. मात्र, त्यांनी सांगितलेल्या प्रसंगाची चर्चा आता आर्यन खानच्या 2021 मधील ड्रग्ज प्रकरणाशी जोडली जात आहे.

पुस्तकातील उल्लेखानुसार, चौकशीदरम्यान संबंधित तरुण भावुक झाला होता. त्याने तपासाच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले होते. सर, तुम्ही तर मला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर बनवून टाकलं. तुम्ही मला ड्रग्ज फायनान्सर बनवून टाकलं. हे योग्य आहे का? एनसीबीला माझ्याकडून कोणतेही ड्रग्जही सापडले नव्हते, अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख संजय कुमार सिंह यांनी केला आहे. संजय कुमार सिंह यांनी पुढे लिहिले आहे की, संबंधित तरुण संपूर्ण प्रसंग सांगताना सतत रडत होता. त्याच्या भावना स्पष्टपणे जाणवत होत्या. चौकशीदरम्यान आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांचा त्याच्यावर मोठा मानसिक परिणाम झाला होता, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Ladki Bahin Yojana: 2100 रुपये कधीपासून मिळणार? उदय सामंत यांनी सांगितली सरकारची भूमिका

मात्र, संजय कुमार सिंह यांनी आपल्या पुस्तकात कोणत्याही सेलिब्रिटीचे किंवा त्याच्या मुलाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे हा प्रसंग आर्यन खानचाच आहे, असा ठोस निष्कर्ष काढता येत नाही. तरीही या खुलाशानंतर 2021 मधील आर्यन खान ड्रग्ज प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जवळपास एक महिना तुरुंगात राहावे लागले. या प्रकरणाने त्यावेळी देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती.

दरम्यान, या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखालील SIT ने तपास केल्यानंतर मे 2022 मध्ये NCB ने आर्यन खानसह अन्य पाच जणांविरोधात पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल केले नाही. SIT ने एकूण 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तपासादरम्यान सुरुवातीच्या तपासातील पुरावे गोळा करण्याच्या पद्धतीत त्रुटी असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे आर्यन खानला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला होता. आता निवृत्त IPS अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या पुस्तकातील या नव्या उल्लेखामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Exit mobile version