नवी मुंबईतील विकासकामांवरून भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भाजप आमदार मंदा म्हात्रे यानी नाव न घेता वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालय, मेडिकल कॉलेज, मरिना प्रकल्प आणि महाराष्ट्र भवन यांसारख्या महत्वाच्या कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा दावा त्यानी केला. भाजपची सत्ता असूनही विकासकामांना पक्षातीलच काही लोक विरोध करत असल्याने म्हात्रे यानी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचा प्रस्ताव तातडीने मंजूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा प्रस्ताव अपक्ष नगरसेवकाच्या माध्यमातून आणून रुग्णालय होऊ नये, अशा पद्धतीने अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप मंदा म्हात्रे यानी केला. मुख्यमंत्र्यानी स्वतः आयुक्तांना काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. तरीही प्रस्ताव पुढे सरकत नसल्याबद्दल त्यानी प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात पहिला आणि देशात दुसरा मरिना प्रकल्प आणल्यानंतरही त्याचे काम रोखण्यात आल्याचा दावा त्यानी केला.
महापालिका आयुक्तांवरही दबाव असल्याचा आरोप करत म्हात्रे यानी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आयुक्तांना वारंवार फाईल पुढे नेण्यास सांगूनही काम होत नसल्याचे त्यानी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. अधिकाऱ्यानी आपल्या पदाचा वापर करून विकासकामे मार्गी लावली पाहिजेत, असे मत त्यानी मांडले. भाजपची सत्ता असतानाही पक्षातीलच काही लोक विकासकामांना विरोध करत असतील, तर त्यांची डीएनए टेस्ट केली पाहिजे, ते खरोखर भाजपचे आहेत का, असा खोचक सवालही त्यानी उपस्थित केला.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
आपणही भाजपची आमदार असून पक्षातील इतरांपूर्वीपासून निवडून येत विकासकामांसाठी प्रयत्न करत असल्याचे मंदा म्हात्रे यानी सांगितले. मुख्यमंत्र्यानी स्टेडियमसाठी २० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्यात आल्याचा उल्लेख त्यानी केला. संबंधित जागा पूर्वी खेळाचे मैदान नसून खड्डा भरून तेथे लोक खेळत होते, असा दावा त्यानी केला. त्या जागेचा व्यावसायिक वापर करून काही लोक कंपन्यांकडून पाच ते दहा लाख रुपये घेत असल्याचा आरोपही त्यानी केला. आपल्या विरोधात लोकांना पुढे कोणी केले, असा सवाल करत त्यानी या प्रकरणामागील व्यक्तींवर निशाणा साधला.
रुग्णालयाचे काम सुरू झाल्यानंतर कंत्राटदारांकडून टक्केवारी मागितली जाईल आणि आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्याचा दबाव आणला जाईल, अशी भीतीही म्हात्रे यानी व्यक्त केली. नगरसेवकांच्या विभागात विकासकामे सुरू झाली की संबंधित नगरसेवकांनाच विरोध करण्यास भाग पाडले जाते, असा आरोप त्यानी केला. विकासकामांच्या प्रत्येक टप्प्यावर अडथळे निर्माण करण्याची ही पद्धत थांबली पाहिजे, असेही त्यानी स्पष्ट केले.
दरम्यान, गणेश नाईक यांचे नाव न घेता केलेल्या या टीकेतून भाजपमधील स्थानिक राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. पक्षाची सत्ता असतानाही भाजपच्या आमदारालाच विकासकामांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत मंदा म्हात्रे यानी व्यक्त केली. रुग्णालय, मेडिकल कॉलेज, मरिना आणि महाराष्ट्र भवन या प्रकल्पांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. आता म्हात्रे यांच्या आरोपांवर वनमंत्री गणेश नाईक किंवा संबंधित महापालिका प्रशासन काय प्रतिक्रिया देते, याकडे लक्ष लागले आहे.
