राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, ‘विलीनीकरणाबाबत खरोखर चर्चा सुरू…’

Devendra Fadnavis on NCP Merger: सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या भेटीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis on NCP Merger:

Devendra Fadnavis on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोर धरला आहे. दोन्ही गट एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर महत्त्वाचं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासोबत झालेल्या भेटीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

भारताने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली, 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव

सुनेत्रा पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा झालीच नाही!

सुनेत्रा पवार या कामकाजासंदर्भात भेटण्यासाठी आल्या होत्या. या भेटीत विलीनीकरणाचा कोणताही विषय निघाला नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. विलीनीकरणाबाबत खरोखर चर्चा सुरू असती, तर त्यांनी आम्हाला त्याची माहिती दिली असती. कारण आम्ही सत्तेत त्यांच्यासोबत आहोत. किमान अशी चर्चा सुरू असल्याचं तरी आम्हाला सांगितलं असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या विलीनीकरणाच्या चर्चा केवळ मीडियामध्येच ऐकायला मिळत आहेत. प्रत्यक्षात आमच्याशी कोणीही याबाबत चर्चा केलेली नाही. त्यामुळे या विषयावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेंचीही चर्चा

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या भूमिकेवरूनही राजकीय चर्चा सुरू आहेत. याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांना या चर्चांमध्ये विनाकारण ‘व्हिलन’ ठरवलं जात असल्याचं म्हटलं होतं. अजित पवार यांच्याशी सुनील तटकरे यांचे काँग्रेसमधील काळापासूनचे संबंध असून, त्यांनी मित्र आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं.

एमपीएससी परीक्षांमधील गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी! प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते योग्य वेळी घेतील आणि सुनेत्रा पवार यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

आमदारांमध्येही संभ्रम?

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनीही विलीनीकरणाच्या चर्चांबाबत भूमिका स्पष्ट केली होती. कोणत्याही आमदाराला यासंदर्भात फोन किंवा संदेश आलेला नाही. तसेच मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. पक्षपातळीवरही अशा हालचाली दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सध्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा नेमक्या कोणत्या स्तरावर सुरू आहेत, याबाबत स्पष्टता नाही.

जे पाप अयोध्येत, तेच छत्रपती संभाजी नगरात! रामाच्या नावाने जमिनीची लूट?, राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

एकीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे संबंधित नेत्यांकडून मात्र अद्याप ठोस भूमिका समोर आलेली नाही. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे विलीनीकरणाबाबत नेमका निर्णय काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us