मी जर मेलो तर मग करा तुम्हाला काय करायचं ते, 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मनोज जरांगे भावनिक

आंतरवली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली.

Untitled Design   2026 08 23T161931.503

Untitled Design 2026 08 23T161931.503

Manoj Jarange emotional before the agitation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा निर्णायक लढ्याची तयारी सुरू झाली असून, 29 ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. जालना जिल्ह्यात झालेल्या या बैठकीत गोदाकाठच्या 123 गावांतील प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे नियोजन, व्यवस्था आणि पुढील रणनीती याबाबत जरांगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मात्र या बैठकीदरम्यान केलेल्या एका भावनिक वक्तव्याने उपस्थितांनाही हेलावून टाकले.

बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टचे आंदोलन हे केवळ आणखी एक आंदोलन नसून मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याचा निर्णायक टप्पा असल्याचे स्पष्ट केले. हे आंदोलन शेवटचे आणि निर्णायक असेल, असे सांगत त्यांनी समाजबांधवांना आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले. आंदोलनाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाने आणि प्रत्येक कुटुंबाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगताना जरांगे म्हणाले, मला प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक हवा आहे. आंदोलनाच्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ प्रत्येक घरातून भाकरी पोहोचली पाहिजे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टँकरची जबाबदारी कोण घेणार हेही ठरवा. आंदोलन दीर्घकाळ चालल्यास कोणतीही अडचण निर्माण होता कामा नये.

“राहुल गांधींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे” फडणवीसांचा हल्लाबोल

आंदोलनाच्या पाहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातून देखील हजारो समाजबांधव आंतरवाली सरातीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्यावर देखील त्यांनी भर दिला. डॉक्टरांची स्वतंत्र टीम तैनात ठेवा. आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आवध्यक सर्व व्यवस्था केल्या पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी समाजबांधवांना दिले. आपला लढा न्यायाचा आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा धिंगाणा किंवा तोडफोड होता कामा नये, असे ते म्हणाले.

बैठकीदरम्यान जरांगे पाटील काहीसे भावुक झाले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरक्षणाच्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आपण अनेक वर्षे उपोषणं केली, आंदोलने केली. आता हे शेवटचं उपोषण असेल. यावेळी 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र घेणार म्हणजे घेणारच. हा लढा अर्धवट सोडायचा नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉलमुळे साखर महागली का ? विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

याचवेळी त्यांनी उपस्थित समाजबांधवांसमोर एक भावनिक विधान केले. मी जर मेलो तर मग करा तुम्हाला काय करायचं ते, असे म्हणत त्यांनी आपल्या संघर्षाची तीव्रता आणि आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात काही काळ शांतता पसरली आणि अनेक कार्यकर्ते भावुक झाल्याचे दिसून आले.

उपोषणादरम्यान आपल्या भूमिकेबाबतही त्यांनी स्पष्ट संकेत दिले. आंदोलनादरम्यान मला पाणी प्या, सलाईन घ्या, असे कोणीही सांगू नका, असे सांगत त्यांनी आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी आता संपूर्ण मराठा समाजाने एकजुटीने उभे राहावे, नियोजनबद्ध तयारी करावी आणि आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करत मनोज जरांगे यांनी बैठकीचा समारोप केला.

दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले असून, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे काय घडते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Exit mobile version