इथेनॉलमुळे साखर महागली का ? विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
Sugar Price Hike : इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 12 टक्के साखर वळवण्यात आली होती. हे प्रमाण 2025-26 मध्ये घटून सुमारे 9 टक्क्यांवर आले आहे.
Sugar Price Hike : एेण सणासुदीच्या काळात देशात साखरेच्या किंमती (Sugar Price Hike) वाढल्या आहेत. राज्यात काही जिल्ह्यात साखर 70 ते 80 रुपयापर्यंत गेलीय. त्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरले आहे. इथेनॉल (Ethanol) निर्मितीसाठी उसाचा वापर केल्याने साखर निर्मिती घटलीय. त्यामुळे साखरेची कमतरता भासत असल्याचा आरोप सरकारवर करण्यात येत आहे. त्यावर आता अन्न व खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने रविवारी एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.
साखरेच्या दरवाढीचा संबंध इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर केल्याशी जोडणे चुकीचे असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ग्राहकांना पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचेही मंत्रालयाने सांगितले. गेल्या काही आठवड्यांत साखरेच्या दरात वाढ झाली आहे. 20 जुलै 2026 रोजी साखरेचा दर प्रतिकिलो 48 रुपये होता. तो 20 ऑगस्ट 2026 रोजी वाढून 55 रुपये प्रतिकिलो झाला आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, ग्राहकांना साखरेचा पुरेसा पुरवठा आणि स्थिर दर सुनिश्चित करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे.
9 टक्के साखर इथेनॉलसाठी वापरली
इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचे प्रमाण प्रत्यक्षात कमी झाले आहे. 2022-23 मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी सुमारे 12 टक्के साखर वळवण्यात आली होती. हे प्रमाण 2025-26 मध्ये घटून सुमारे 9 टक्क्यांवर आले आहे. याशिवाय, देशात उत्पादित होणाऱ्या इथेनॉलपैकी जवळपास तीन चतुर्थांश इथेनॉल आता धान्यापासून, विशेषतः मक्यापासून तयार केले जाते.
साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे
सध्या साखरेच्या किमती वाढण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. देशांतर्गत साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणे, सणासुदीच्या काळापूर्वी मागणीत वाढ होणे, हवामानामुळे ऊस पिकाचे नुकसान होणे, जागतिक बाजारपेठेत साखरेचा पुरवठा कमी होणे तसेच उद्योगातील काही घटकांकडून सट्टेबाजी आणि साठेबाजी होणे, या कारणांमुळे साखरेच्या दरात वाढ झाली आहे.
रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू; नेमकं काय घडलं?
साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी
यंदाच्या हंगामात देशातील साखरेचे उत्पादन सुमारे 306 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. ऊस उत्पादक राज्यांनी सुरुवातीला सुमारे 343 लाख मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ऊस पिकावर रेड रॉट आणि टॉप बोरर या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे काही भागात पाणी साचल्यानेही ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही भागात दुष्काळही पडलेला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखर उत्पादन कमी राहणार आहे.
Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution- "Sugar prices have increased in recent weeks, from ₹48.18 per kg on 20 July 2026 to ₹55.70 per kg on 20 August 2026. The Government is closely monitoring the situation and has taken a series of measures to ensure… pic.twitter.com/V1kjYeDEIq
— ANI (@ANI) August 21, 2026
देशात साखरेचा पुरेसा साठा
उत्पादन अंदाजापेक्षा कमी असले तरी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नवीन गाळप हंगाम सुरू होईपर्यंत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साखर साठा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
जागतिक बाजारातही साखरेचे दर वाढले
केवळ भारतातच साखरेच्या किमती वाढलेल्या नाहीत, तर जागतिक बाजारपेठेतही साखरेच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचाही साखरेच्या किमतींवर परिणाम होत आहे.