‘टॉक्सिक’च्या हैदराबाद प्री-रिलीज सोहळ्याला 45 हजारांहून अधिक चाहत्यांची गर्दी; यशचा जल्लोषात दमदार संदेश
22 ऑगस्ट रोजी मल्ला रेड्डी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला तब्बल 45 हजारांहून अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली.
‘Toxic’s’ Hyderabad pre-release event : जगभरात 26 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाच्या टीमने हैदराबादमध्ये भव्य प्री-रिलीज सोहळ्याचे आयोजन केले. 22 ऑगस्ट रोजी मल्ला रेड्डी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला तब्बल 45 हजारांहून अधिक चाहत्यांनी उपस्थिती लावली. रॉकिंग स्टार यश आणि चित्रपटाच्या टीमला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यात रॉकिंग स्टार यश, कियारा अडवाणी, रुक्मिणी वसंत, हुमा कुरेशी, अक्षय ओबेरॉय आणि सुदेव नायर यांनी एकत्रितपणे मंच गाजवला. याशिवाय चित्रपटाचे निर्माते वेंकट के. नारायण आणि दिल राजू यांच्यासह चित्रपटाशी संबंधित अनेक महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. हजारो चाहत्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने आणि जल्लोषाने भारावून गेले होते. ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’च्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.
यावेळी बोलताना यशने ‘केजीएफ’पासून मिळालेल्या प्रेमाबद्दल तेलुगू प्रेक्षकांचे आभार मानले. विविध भाषांतील प्रेक्षकांमधील नातेसंबंधांविषयी बोलताना तो म्हणाला, “भाषा, सीमा किंवा राजकारण यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला वेगळं करू शकत नाही. भाषेपलीकडे, सीमांपलीकडे माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणा आहे.”
हिंगोलीत कावड यात्रेत दोन डीजेंची भीषण धडक; रिव्हर्स घेत धडकवलेल्या वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढत्या ताकदीवर भाष्य करताना यश म्हणाला, “आज आपण सर्वजण मिळून भारतीय चित्रपटसृष्टी आहोत. आणि लवकरच भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक नकाशावर आणखी मोठ्या स्थानावर पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे.” कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्याने मोठी स्वप्ने पाहण्याचा, कठोर परिश्रम करण्याचा आणि स्वतःच्या यशाची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्लाही दिला.
हैदराबादशी विशेष नाते असलेल्या कियारा अडवाणीने तेलुगू प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या पहिल्या तेलुगू चित्रपट ‘भारत अने नेनू’ची आठवण सांगताना ती म्हणाली, “तेलुगू प्रेक्षकांसारखं प्रेम जगात कुठेही मिळत नाही. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. ‘टॉक्सिक’ हा फक्त कन्नड किंवा इंग्रजी चित्रपट नाही. तो तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी प्रेक्षकांचाही चित्रपट आहे, कारण हा एक भारतीय चित्रपट आहे.”
तिने प्रेक्षकांना 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन करताना, “आता तुम्हाला आमच्या चित्रपटाचा खरा आत्मा पाहायला मिळेल,” असे सांगितले. रुक्मिणी वसंतने मल्ला रेड्डी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार मानले. यशसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली, “यश सर, तुमच्यासोबत काम करणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्वप्नांपैकी एक पूर्ण झाल्यासारखं वाटतं.”
देशात आजही 20 ते 25 लाख टन साखर,15 दिवस द्या सगळी साखर बाहेर काढून दाखवतो
हुमा कुरेशीनेही हैदराबादमध्ये मिळालेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला. दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्याविषयी बोलताना ती म्हणाली, “जेव्हा त्यांनी मला या भूमिकेसाठी विचारणा केली, तेव्हा मी इतिहासाचा भाग होणार आहे याची कल्पनाही नव्हती.” यशच्या दृष्टीकोनाचे कौतुक करताना हुमा म्हणाली, “हा चित्रपट बनवल्याबद्दल आणि चित्रपटसृष्टीत बदल घडवून आणण्याचे धाडस दाखवल्याबद्दल यशचे आभार.”
हैदराबादमधील हा भव्य प्री-रिलीज सोहळा ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’साठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगलाही उत्तम प्रतिसाद मिळत असून, 26 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक प्रदर्शनाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.