Sugar Price Hike : साखरेचे भाव कमी होणार, सरकार अॅक्शन मोडवर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sugar Price Hike : देशात गेल्या काही दिवसांपासून साखरेचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांचे बजेट बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे
Sugar Price Hike : देशात गेल्या काही दिवसांपासून साखरेचे भाव गगनाला भिडल्याने अनेकांचे बजेट बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आता सर्वसामान्य जनाता देखील त्रस्त होत आहे. यातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या (Raw Sugar) आयातीला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर देशात साखरेचे भाव कमी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
20 ऑगस्ट रोजी साखरेच्या घाऊक दरात 525 रुपयांपर्यंत वाढ झाली. किरकोळ बाजारातही साखरेचा दर प्रति किलो 69 रुपयांवर पोहोचला, तर ब्रँडेड आणि पॅकबंद साखरेचा दर प्रति किलो 80 रुपयांवर गेला आहे. ‘चिनीमंडी’ (Chinimandi) वर प्रकाशित झालेल्या 20 ऑगस्ट 2026 च्या घाऊक दरानुसार, प्रमुख बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात एका दिवसात प्रति क्विंटल सुमारे 400 ते 525 रुपयांची वाढ झाली. याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे.
साखरेच्या घाऊक दरात वाढ
घाऊक बाजारात अहमदाबादमध्ये साखरेचा दर प्रति क्विंटल 6,405 रुपये होता, यापूर्वी दर 525 रुपये होता. कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर प्रति क्विंटल 6,562.50 रुपयांवर पोहोचले आहे. या दोन्ही ठिकाणी 472.50 रुपयांची वाढ नोंदवली गेली. कोल्हापुरात दर 446.25 रुपयांनी वाढून 6,405 रुपये प्रति क्विंटल झाला, तर दिल्लीत 420 रुपयांच्या वाढीसह तो 6,510 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. कानपूरमध्ये साखरेचा दर 6,531 रुपये प्रति क्विंटल आहे, तर बेंगळुरूमध्ये 6,457.50 रुपये आणि मुझफ्फरनगरमध्ये 6,468 रुपये दर नोंदवले गेले.
साखरेच्या किरकोळ दरात मोठी वाढ
किरकोळ बाजारातील आकडेवारीवरूनही दरातील ही वाढ दिसून येते. 11 ऑगस्ट रोजी दिल्लीत साखरेचा दर प्रति किलो 53 रुपये होता 20 ऑगस्टपर्यंत तो वाढून प्रति किलो 67 रुपये झाला म्हणजेच अवघ्या नऊ दिवसांत प्रति किलो 14 रुपयांची वाढ झाली. मुंबईत 52 रुपयांवरून 67 रुपये प्रति किलो आणि कोलकातामध्ये 53 रुपयांवरून 68 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले.
वाढते भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय
10 लाख टन साखरेची आयात
देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत 10 लाख (1 मिलियन) मेट्रिक टनांपर्यंत कच्ची साखर शुल्कमुक्त (Duty Free) आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 10 लाख मेट्रिक टनांचा ‘टॅरिफ रेट कोटा’ (TRQ) लागू असेल. या कोट्यांतर्गत, अधिसूचनेतील अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून, विहित मर्यादेपर्यंत कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करता येईल. तसेच, आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तयार केलेली साखर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत देशांतर्गत बाजारपेठेत विकली जावी, अशी अटही घालण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी भाजपमधूनच कारस्थान पण…, प्रकाश महाजन असं का म्हणाले? –
साठ्यावर देखरेख
साखरेचे वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने बुधवारी एक आदेश जारी केला. या आदेशानुसार, दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त काळ साठा करून ठेवता येणार नाही. अधिसूचनेनुसार, हा आदेश 1 सप्टेंबरपासून लागू होईल आणि 30 नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहील.