‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!

Manoj Jarange मनोज जरांगे 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार असून, 19 सप्टेंबरला आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

Manoj Jarange Mumbai March

Manoj Jarange Mumbai March मनोज जरांगे पाटील 15 सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार असून, 19 सप्टेंबरला आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

Manoj Jarange Mumbai March: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुंबईतील आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. जरांगे 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील आझाद मैदानात पोहोचून बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

Video : ठरलं! जरांगे पाटलांचा मुंबईला जाण्याबाबत मोठा निर्णय, ‘या’ तारखेला अझाद मैदानात उपोषण

असा असेल मुंबईकूचचा मार्ग

जरांगे पाटील यांच्या नियोजनानुसार मुंबईकडे जाताना पाच ठिकाणी मुक्काम केला जाणार आहे. पहिला मुक्काम 15 सप्टेंबरला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असेल. त्यानंतर दुसरा मुक्काम 16 सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, तिसरा मुक्काम 17 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर आणि चौथा मुक्काम 18 सप्टेंबरला खोपोली किंवा कोपरखैरणे येथे करण्याचे नियोजन आहे. पाचव्या दिवशी 19 सप्टेंबरला आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात दाखल होतील.

‘मार्गावर येऊन आशीर्वाद द्या’

मुंबईला येणे शक्य नसलेल्या मराठा बांधवांनी आपण ज्या मार्गाने मुंबईकडे जाणार आहोत, त्या मार्गावर कुटुंबासह उपस्थित राहून आंदोलनाला पाठींबा आणि आशीर्वाद द्यावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच ज्या मराठा बांधवांकडे वाहने आहेत, त्यांनी आंदोलकांना मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले.

‘माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन शांततेनेच आंदोलन करतील’; जरांगेंच्या मुंबईकूचवर अमृता फडणवीसांचा विश्वास

‘आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे आणि मुंबईत जाऊन जिंकून यायचे आहे,’ असे सांगत त्यांनी आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले.

‘शांततेत आंदोलन करू; धक्का लावला तर महाराष्ट्र बंद’

जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, आंदोलनाला अडथळा आणण्याचा किंवा आंदोलकांना धक्का लावण्याचा प्रयत्न सरकारकडून झाल्यास मराठा बांधवांनी अख्खा महाराष्ट्र 10 मिनिटांत बंद करावा, असा इशाराही त्यांनी दिला.

‘जेवढे आंदोलक मुंबईला जातील, तेवढे आरक्षण घेऊनच परत येतील,’ असा दावा करत ही लढाई निर्णायक असल्याचे त्यांनी म्हटले. ‘आता ही शेवटची लढाई आहे. मेलो तरी चालेल, पण मागे हटणार नाही,’ असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

महिलांनाही मुंबईकूचचे आवाहन

महिलांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हायचे असल्यास एका घरातून एकाच महिलेने यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच मराठा महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या घरी जाऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घ्यावा, असेही त्यांनी म्हटले.

जरांगेंची मुंबई आंदोलनाची हाक; अंतरवालीतील बैठकीनंतर मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता

लता शिंदे आणि अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी घराबाहेर यावे, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी यासंदर्भात राजकीय वक्तव्यही केले.

“फडणवीस साहेबांची आणि एकनाथ शिंदेंची पत्नी जर हळद-कुंकाच्या कार्यक्रमासाठी घराच्या बाहेर नाही आल्या, तर त्या हिंदू कशा? त्या हिंदू असतील घराच्या बाहेर येतील. त्या घराबाहेर आल्या की मराठा महिलांनी त्यांना आरक्षण मागावं”, असे मनोज जरांगे म्हणाले.

खानदेश आणि विदर्भातील मराठा बांधवांना हाक

मुंबईकडे होणाऱ्या या आंदोलनात खानदेश आणि विदर्भातील मराठा बांधवांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. ‘आम्ही संकटात आहोत, आमच्या मदतीला या,’ असे आवाहन त्यांनी केले.

जरांगे पाटलांचा मुंबईत जाण्याचा निर्धार; मागण्यांचा पाढा वाचताना अश्रू अनावर

तसेच सर्व राजकीय पक्षांमधील मराठा नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत रस्त्यावर उतरावे, असेही त्यांनी म्हटले. आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांना आगामी निवडणुकीत निवडून देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

‘सरकारकडे अजूनही संधी’

आपण मुंबईत पोहोचेपर्यंत सरकारकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुंबईत येण्यापूर्वीच सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुंबईकडे होणारे आंदोलन शांततेत आणि लोकशाही मार्गानेच पार पाडण्याचे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मुंबईकूचच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका आणि प्रशासनाची तयारी याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version