Manoj Jarange Hunger Strike Update : मी मुंबईला जाणार आहे. लगेच कुणीही मुंबईकडं येऊ नये, मी सांगितल्यावरच सर्वांनी मुंबईमध्ये या अशी घोषणा मनोज जरांगे पाटील (Jarange) यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांची तब्येत जास्त खालावल्याने ते काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होत. अखेर, त्यांनी निर्णय जाहीर केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मुंबईकडे जाण्याचा निर्धार पुन्हा स्पष्ट केला. सरकारकडून काहीतरी ड्राफ्ट पाठवण्यात आल्याचं सांगत त्यांनी, “मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही. गुरुवारी दुपारी 1 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहे. नारायणगडाच्या महंतांनी आणि गुरुगादीने विनंती केल्यानंतर सलाईन घेतली. सध्या उठता-बसता येत नाही, हाता-पायांत आणि पोटात प्रचंड आग होत आहे. तरीही मी 100 टक्के मुंबईला जाणार म्हणजे जाणार,” असं म्हटलं.
Manoj Jarange Health : मनोज जरांगेंची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल करण्याची डॉक्टारांची सूचना
दरम्यान, सरपंच ड्राफ्ट घेऊन येत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. त्यामुळे आजचा दौरा थांबवण्यात आला असला तरी उद्या त्याच मार्गाने पुढे जाण्याचा इशारा त्यांनी दिला. “18 तारखेला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर जाणार आहे. उद्या थेट मुंबईच्या दिशेने निघेन आणि जवळच थांबेन. मला कोण अडवतंय, हे पाहायचं आहे. मला जाऊ दिलं नाही तर मराठ्यांना बोलावणार,” असा इशाराही जरांगे यांनी दिला.
मुंबईकडे निघण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनी ठाम भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला. मार्गात पोलिसांकडून अडवणूक होऊ नये, अशी मागणी करत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. अडवण्याचा किंवा लाठीचार्जचा प्रयत्न झाल्यास मोठ्या संख्येने मराठे मुंबईकडे येतील, असा दावा त्यांनी केला. “आम्ही ठरलेल्या मार्गानेच जाणार आहोत. मात्र रस्त्यात आम्हाला थांबवू नका. हार-फुलांची गरज नाही,” असं जरांगे यांनी म्हटलं.
दरम्यान, उद्याचा मुक्काम श्रीगोंदा, हडपसर किंवा खोपोली येथे होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईच्या दिशेने आणखी जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. सरकारसोबत चर्चेची शक्यता अद्याप कायम असल्याचं स्पष्ट करत त्यांनी, “चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. सरकारनं कधीही आणि कुठेही चर्चेसाठी यावं. गेल्या काही दिवसांत माझी प्रकृतीही बिघडली होती. रात्री 3 वाजल्यापासून मला काहीच कळत नव्हतं. माझ्यासाठी समाज आणि तुम्हीच सर्वकाही आहात,” असं म्हटलं.
मुंबईत प्रवेश रोखण्याची भाषा करणाऱ्या मंत्र्यांनाही जरांगे यांनी आव्हान दिलं. “कोणता मंत्री मुंबईत येऊ देणार नाही म्हणत असेल, तर त्याच्या घरीच जातो. तीन वर्ष माझी भाषा गोड लागली, मग आता ती का बदलली? कॅबिनेट एकतर्फी असते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
