Manoj Jarange Health : मनोज जरांगेंची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल करण्याची डॉक्टारांची सूचना
Manoj Jarange Health : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांंगे पाटील 29 ऑगस्टपासून उपोषण करत असून आज त्यांच्या
Manoj Jarange Health : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांंगे पाटील 29 ऑगस्टपासून उपोषण करत असून आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. 19 व्या दिवशी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. जरांगे पाटील 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी निघाले आहे. मुक्काम असलेल्या पाटोद्यात रात्री तीन वाजता सरकारी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती तपासणी केली. तसेच सकाळी देखील त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्याची सूचना केली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
तर दुसरीकडे आता देखील उपोषणावर मनोज जरांगे (Manoj Jarange) ठाम असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत असून त्यांचा बीपी (BP) आणि रक्तातील साखरेची पातळी खाली आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याने आणि त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले आहे.
माहितीनुसार, पाटोद्यात रात्री तीन वाजता जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखालील विशेष वैद्यकीय पथक रात्री 3 च्या सुमारास पाटोदा येथील मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाले होते.
जरांगे पाटील यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांच्या शरीरात अशक्तपणा आढळून आला तसेच बीपी आणि रक्तातील साखरेची पातळी देखील खाली आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यानंतर तातडीने सलाईन आणि औषधोपचार घेण्याचा सल्ला जरांगे पाटील यांनी देण्यात आला होता मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
तर दुसरीकडे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे. यावर आता मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटलांना एक महत्त्वाचे पत्र देण्यात आले आहे. अर्जाचा अवलोकन केले असता जरंगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये आणि त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास दिसून येत असल्याचे मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. यापूर्वी दोनदा जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी अर्ज केला होता मात्र मुंबई पोलिसांनी परवानगी दिली नव्हती.