Manoj Jarange’s major announcement : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबई आंदोलनाची तयारी सुरू केली असून मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. आजपासूनच हळूहळू मुंबईत दाखल होण्यास सुरुवात करा आणि पुढील 12 दिवस आपल्या सोयीनुसार मुंबईत पोहोचा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, आझाद मैदानावर आताच जाऊ नका. मुंबईत मित्र, नातेवाईक किंवा पाहुण्यांकडे राहा. आपण मुंबईत आल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करू, असेही त्यांनी सांगितले. सरकारकडून अद्याप आपल्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नसल्याचा दावाही जरांगे यांनी केला.
आजपासून मुंबईत जायला सुरुवात करा. पुढचे 12 दिवस हळूहळू मुंबईत जा. सगळ्यांनी एकाच वेळी जाणे शक्य नाही. मी देखील हळूहळू मुंबईत येतो. मी मुंबईत आल्यानंतर तुम्ही बाहेर पडा. तोपर्यंत मित्र, नातेवाईक आणि पाहुण्यांकडे राहा. आझाद मैदानावर जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. गणपती पाहण्यासाठी किंवा मुंबईतील नातेवाईकांना भेटण्यासाठी जाता येईल, मात्र आंदोलनाच्या ठिकाणी आताच गर्दी करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत जाणाऱ्यांनी आंदोलनाशी संबंधित ओळख ठळकपणे प्रदर्शित करू नये, असेही जरांगे यांनी समर्थकांना सांगितले. जे मुंबईला जात आहेत त्यांनी वाहनांना झेंडे बांधून जाऊ नका. हळूहळू आणि आपल्या सोयीनुसार जा. मराठे मुंबईत आले आहेत, हे कोणालाही कळू देऊ नका, असे जरांगे म्हणाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यास घाबरून जाऊ नका आणि पोलिसांना सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतले तर नीट पोलीस ठाण्यात जा. घाबरण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
‘एकही बांगलादेशी फेरीवाला दिसता कामा नये’; नेवाशात किरीट सोमय्यांचा प्रशासनाला इशारा
मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून संपर्क साधण्यात आल्याच्या चर्चांवरही जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारकडून माझ्याशी अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही. त्यांच्या जवळच्या कोणाला निरोप आला असेल तर मला माहिती नाही, पण मला कोणताही निरोप आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत आणि सरकारकडून संपर्क साधला जाण्याच्या चर्चेबाबत बोलताना, 24 तासांत संपर्क साधू म्हणजे हे पावसासारखे आहे का, हळूहळू सरी पडणार? पोरांनो, आपले मुंबईचे सुरू करा, असे जरांगे म्हणाले.
गणेशोत्सवाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला. गणेशोत्सव आपलाच आहे. आम्ही 11 दिवस गणपती बसवतो आणि ते दीड दिवस गणपती बसवतात. तरीही ते आम्हाला देव-देव शिकवतात. आमच्याएवढे देवाचे आणि पुण्याचे काम कोण करते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण उपोषण सोडणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मी कालपासून येथून उठलेलोही नाही. आता 24 तासांचा विषय सोडून द्या आणि मुंबईची तयारी सुरू करा. 12 तारखेच्या अगोदर हळूहळू मुंबईत पोहोचा.
‘हिरो कोण विचारलं तर एकानं खान, दुसऱ्यानं पुष्पा सांगितलं’; समीर वानखेडेंचं नव्या पिढीवर भाष्य
आपल्या सोयीनुसार तिथे राहा. मात्र आझाद मैदानावर जाऊ नका. मी मुंबईत आल्यानंतरच तिकडे या. मी उपोषण सोडणार नाही आणि तुमच्यासोबत मुंबईत येणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत “कितीही मोठे घोटाळे केले तरी भाजपमध्ये गेलेले लोक जेलमध्ये जात नाहीत. हे दोन संविधान चालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
आता मराठा समाजाने आपले लक्ष्य स्पष्ट ठेवायचे असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष द्यायचे आहे, असेही जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत जरांगे यांनी समाजाला 12 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने जाण्याऐवजी आपल्या सोयीनुसार मुंबईत पोहोचा, नातेवाईक किंवा मित्रांकडे मुक्काम करा आणि आपण मुंबईत आल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून अद्याप कोणताही संपर्क झालेला नसल्यामुळे आता मुंबई आंदोलनाची तयारी सुरू करा, असा संदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे.
