Meals reached the students : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान मंगळवारी एक वेगळाच चित्र पाहायला मिळालं. आंदोलनाच्या ठिकाणी दिवसभर स्वीगी, झोमॅटो आणि इतर फूड डिलिव्हरी सेवांच्या दुचाकींची वर्दळ सुरू होती. आंदोलक विद्यार्थ्यांसाठी देशभरातून ऑनलाईन पद्धतीने अन्नपदार्थ पाठवले जात असल्याने जंतरमंतर परिसर अक्षरशः एका मोठ्या अन्नछत्रात परिवर्तित झाल्याचे चित्र दिसून आले.
या आंदोलनाला मिळणार जनसमर्थनाचा अनोखं चेहरा यावेळी समोर आला. मुंबई, हैद्राबाद, पंजाब, दिल्लीसह देशभरातील विविध शहरांतील नागरिकांनी घरबसल्या फूड डिलिव्हरी अँप्सच्या माध्यमातून जंतरमंतरच्या पत्त्यावर जेवणाची ऑर्डर दिली. विशेष म्हणजे, अनेकांनी ओरडारसोबत हे जेवण आंदोलनस्थळी असलेल्या कोणत्याही भुकेल्या व्यक्तीला द्या, असा संदेश देखील पाठवला होता. त्यामुळे कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या अनेक उपहारगृहांकडून जंतरमंतरकडे सतत खाद्यपदार्थ पाठवले जात होते.
डिलिव्हरी बॉय आकाश याने सांगितले की, दुपारी चार वाजेपर्यंत त्याने एकट्याने जंतरमंतरवर किमान दहा डिलिव्हरी केल्या होत्या. त्याच्यासोबत आणखी अनेक डिलिव्हरी कर्मचारी फक्त आंदोलनस्थळी अन्नपदार्थ पोहोचवण्याच्या कामात व्यस्त होते. दिवसभर विविध खाद्यपदार्थांच्या पिशव्या, पार्सल्स आणि पॅकेट्स आंदोलनस्थळी पोहोचत असल्याने परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, आंदोलकांची देशभरातून अंदाजे 500 हुन अधिक ऑनलाईन ऑर्डर्स पाठवण्यात आल्या. यात पिझ्झा, बर्गर, सामोसे, संपूर्ण जेवणाच्या थाळ्या, बिर्याणी तसेच इतर अनेक खाद्यपदार्थांचा समावेश होता. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यातील एका व्हिडिओमध्ये मुसळधार पावसात बसलेल्या विद्यार्थ्यांना एक डिलिव्हरी बॉय खाद्यपदार्थांचे पॅकेट देताना दिसतो. मुंबईतील एका व्यक्तीने हे पार्सल पाठवले आहे, असे तो सांगताना दिसतोय.
दिल्लीतल्या घडामोडींना वेग, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
मुंबईतील अनुज रावत नावाच्या नागरिकाने केलेली अशीच एक ऑर्डर विशेष चर्चेत आली. त्यांनी डिलिव्हरीसोबत पाठवलेल्या संदेशात आंदोलनस्थळी असलेल्या कोणत्याही गरजू किंवा भुकेल्या व्यक्तीला जेवण देण्याची विनंती केली होती. अनेक स्वयंसेवक आणि तरुण संसद मार्ग तसेच जनपथ परिसरात डिलिव्हरी बॉईजकडून पार्सल स्वीकारून ते आंदोलकांपर्यंत पोहोचवत असल्याचेही दिसून आले.
दरम्यान, मदतीचा ओघ केवळ ऑनलाईन ऑर्डर्सपुरता मर्यादित नव्हता. आंदोलनस्थळाच्या परिसरात अनेक स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी गटांनी पिण्याचे पाणी, फळे, बिस्किटे, ज्यूस, आईस्क्रीम, चॉकलेट्स, कढी-भात, बिर्याणी आणि इतर खाद्यपदार्थांचे मोफत वितरण सुरू केले होते. काहींनी स्टॉल उभारले होते, तर काही जण थेट आंदोलकांमध्ये फिरून मदत वाटत होते.
पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करणाऱ्या एका तरुणीने सांगितले की, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तिने स्वतःच्या अर्ध्या दिवसाचा पगार पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी खर्च केला. अशा अनेक छोट्या-मोठ्या मदतीमुळे जंतरमंतरवरील आंदोलनाला देशभरातून मिळणारा पाठिंबा आणि लोकांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येत आहे.
जंतरमंतरवरील हे आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिले नसून, देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिक डिजिटल माध्यमातून त्यात सहभागी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. फूड डिलिव्हरी अॅप्सद्वारे पाठवले जाणारे अन्न, स्वयंसेवकांची धावपळ आणि स्थानिकांकडून मिळणारी मदत यामुळे आंदोलनाला एका व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
