दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?
जंतर-मंतरवर आंदोलन करण्यावर कॉक्रोज जनता पार्टी ठाम असून, आता या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत.
CJP resolves to protest again at Jantar Mantar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) मुद्द्यावरून कॉक्रोज जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन मागे घेण्यास पक्ष तयार नाही. आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यावर कॉक्रोज जनता पार्टी ठाम असून, आता या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे करणार आहेत.
एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेत कॉक्रोज जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेमुळे पात्र मतदारांची नावं वगळली जाण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात येतोय. या प्रक्रियेतील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणीही पक्षाने केली आहे.
दरम्यान, काल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणी आंदोलकांना रोखत अनेकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही आज पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शहरातील 37 ठिकाणी बॅरिकेडिंग पॉइंट उभारण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दिल्ली पोलीस सतर्क आहेत.
केंद्र सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न; तमिळनाडूत ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचा घणाघाती आरोप
अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी आंदोलनाची सूत्रं हाती घेतली आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातील सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून, जुलै महिन्यात झालेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अहंकाराला धक्का बसल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
तसंच, आज पुन्हा जंतर-मंतरवर येऊन आंदोलन करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपला लढा थांबणार नाही, असा इशारा अजिंक्य शिंदे यांनी दिला आहे.
दुसरीकडे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो सेवाही चर्चेत आहे. काल रात्री उशिरा मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून, आजही मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याचं दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आज जंतर-मंतरवर नेमकं काय घडतं आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कॉक्रोज जनता पार्टी आंदोलन कसं पुढे नेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.