‘मला संधी मिळण्याची 100 टक्के शक्यता वाटते’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत खासदार संजय जाधव

परभणीचे खासदार संजय बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

Untitled Design   2026 08 22T174047.408

Untitled Design 2026 08 22T174047.408

MP Sanjay Jadhav in discussions regarding the Union Cabinet expansion : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना शिवसेना पक्षातील काही खासदारांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय जाधव यांनीही आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय जाधव यांनी आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि शिवसैनिक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेतकरी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, विकासकामांशी संबंधित प्रश्न आणि स्थानिक मुद्दे जाणून घेतले जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना जाधव म्हणाले की, अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे.

कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क आहे आणि त्यामुळेच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे. आगामी मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना नवे बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारण्यात आले असता जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, विस्तार कधी होणार याची माहिती त्यांच्याकडे नाही. हा निर्णय केंद्र सरकार आणि भाजपचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि पक्षाने आपले नाव सुचवले तर संधी मिळू शकते. पक्षाने नाव सुचवले नाही तरी त्याबाबत कोणतीही चिंता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मी 2019 ला मविआचा प्रस्ताव पुढे केला” पृथ्वीराज चव्हाणांचा दावा; “आता पुलाखालून पाणी गेलंय” म्हणत दरेकरांचा पलटवार

यावेळी बोलताना त्यांनी एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मला मंत्रिपद मिळण्याची 100 टक्के शक्यता वाटते, असे ते म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, पक्षातील अनेक खासदारांना अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आमच्या ओमराजेंनाही वाटते, बारणे आप्पांनाही वाटते आणि मलाही वाटते. पण मंत्रिपद कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही, हा निर्णय अखेर पक्ष नेतृत्वाचाच असतो, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून काही खासदारांना देण्यात आलेल्या नोटिसांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाची जबाबदारी पक्षाकडे असून पक्षाने त्यासाठी कायदेशीर पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले. इतर खासदारांना नोटीस आली असेल तर मलाही आली असेल. मात्र, आम्ही पक्षात वेगळा निर्णय घेतला तेव्हा अशा सर्व परिस्थितींना सामोरे जावे लागेल, याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे आम्ही त्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमध्ये आपले नाव पुढे येत असताना संजय जाधव यांनी व्यक्त केलेला आत्मविश्वास आणि पक्ष नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.

Exit mobile version