चॅट जीपीटीवर शोध, लोहगडाची रेकी अन् फेक इंस्टग्राम आयडी, केतन प्रकरणातील कथित कटाची संपूर्ण कहाणी

केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांचा या कटात सहभाग असल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे.

Untitled Design   2026 09 20T091523.439

Untitled Design 2026 09 20T091523.439

Mystery behind Ketan Agarwal’s death solved : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या लोहगडावरील संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. केतनचा मृत्यू अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप पोलिसांनी केला असून, या प्रकरणात न्यायालयात तब्बल 5 हजार 53 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांचा या कटात सहभाग असल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं आहे.

तपासानुसार, मार्च 2026 पासूनच केतनविरोधात कट रचण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला परराज्यातील व्यक्तीला सुपारी देऊन केतनवर प्राणघातक हल्ला करत त्याला कायमचं अपंग करण्याची योजना होती. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने हा प्लॅन रद्द करण्यात आला. या कटातील एक मध्यस्थ पुढे पोलिसांचा महत्त्वाचा साक्षीदार बनला.यानंतर केतनची हत्या अपघातासारखी भासवण्यासाठी आरोपींनी गुन्हेगारी चित्रपट आणि पॉडकास्टचा अभ्यास केल्याचं तपासात म्हटलं आहे.

इतकंच नाही तर हत्येची पद्धत शोधण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केल्याचा आणि मेघालयातील चर्चित ‘सोनम रघुवंशी’ प्रकरणाचाही अभ्यास केल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात आहे. 29 मे रोजी सिया आणि चेतनने लोणावळ्यातील टायगर पॉईंटसह विविध ठिकाणांची रेकी केली. मात्र तिथे सीसीटीव्ही असल्याने लोहगडाची निवड करण्यात आली. लोहगडावरून पडल्यास ‘सेल्फी काढताना तोल गेला’ असा अपघाताचा बनाव करता येईल, अशी योजना आखण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

काळाचौकीत महागणपती मंडपात मध्यरात्री अनर्थ! विजेच्या धक्क्याने 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, पाच जण जखमी

14 जून रोजी सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली आणि त्याला खाली ढकलण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर आरोपींनी ‘माही’ नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं. 18 जून रोजी या अकाऊंटवरून केतनशी संपर्क साधून सियाला वाढदिवसाचं सरप्राईज देण्याच्या बहाण्याने त्याला पुन्हा लोहगडावर बोलावण्यात आलं. ठरलेल्या योजनेनुसार चेतन आधीच गडावर पोहोचून मंदिराजवळ लपला होता. सिया केतनला त्या ठिकाणी घेऊन आली. त्यानंतर सियाने केतनच्या खांद्याला धक्का दिला आणि चेतनने त्याच्या पायावर लाथ मारल्याने केतन शेकडो फूट खोल दरीत कोसळल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

या प्रकरणात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे, कथित रेकी आणि बनावट सोशल मीडिया अकाऊंटसह विविध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची साखळी जोडली आहे. आता 5 हजार 53 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर या गंभीर आरोपांची पुढील कसोटी न्यायालयीन सुनावणीत लागणार आहे.

Exit mobile version