काळाचौकीत महागणपती मंडपात मध्यरात्री अनर्थ! विजेच्या धक्क्याने 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, पाच जण जखमी
गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनांनंतर आता दक्षिण मुंबईतील काळाचौकीच्या महागणपती मंडळाच्या परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.
Death by electrocution in Kalachowki : मुंबईतील यंदाच्या गणेशोत्सवाला दुर्घटनांचे गालबोट लागले असून, विघ्नांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनांनंतर आता दक्षिण मुंबईतील काळाचौकीच्या महागणपती मंडळाच्या परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मंडप परिसरात विजेचा धक्का लागल्याने आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून इतर जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लालबाग-परळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काळाचौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक परिसरात आले होते. याचवेळी अचानक काही मुलांना विजेचा धक्का लागल्याने एकच खळबळ उडाली. दुर्घटनेत लहान मुलं आणि तरुणांचा समावेश असून जखमींचे वय साधारण 8 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. काही जखमींना मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर प्रकृती गंभीर असलेल्या एका मुलीला पुढील उपचारासाठी परळच्या ग्लोबल रुग्णालयात नेण्यात आले.
विखे घराण्याची लेक खासदार ! नीला अशोक विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत एन्ट्री
मात्र उपचार सुरू असतानाच आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. इतर जखमींवर उपचार सुरू असून काहींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दुर्घटनेतील सर्वजण याच परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. मंडप परिसरात एकाचवेळी अनेकांना विजेचा धक्का नेमका कसा लागला? विद्युत व्यवस्थेत काही बिघाड झाला होता का? वायरिंगमधून विद्युत प्रवाह उतरला होता का? याचा आता तपास केला जात आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या दुर्घटनेमुळे काळाचौकीसह लालबाग-परळ परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
यंदाच्या मुंबईतील गणेशोत्सवात यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. गणेशमूर्तींच्या आगमनादरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती कोसळण्याच्या घटना समोर आल्या होत्या. 22 ऑगस्ट रोजी भुलेश्वरच्या राजाची गणेशमूर्ती कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. मूर्तीखाली दबून संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत राहावं; ‘सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत’ राहुल गांधी
त्यानंतर कुर्ला परिसरात धारावीतील प्रेमनगरचा महाराजा मंडळाची गणेशमूर्ती कोसळली होती. दुर्घटनेत मूर्ती तुटल्यामुळे नंतर तिचे कुर्ल्यातील शीतल तलावात विसर्जन करण्यात आले. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे यंदाच्या मुंबईतील गणेशोत्सवातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असताना मंडपातील विद्युत व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि इतर सुरक्षा उपायांची काटेकोर तपासणी करण्याची गरज या दुर्घटनेनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे.