‘काँग्रेसचे 75, मविआचे 160 आमदार निवडून येणार होते, ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने दिला होता अहवाल’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole MVA 160 MLAs Claim: इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालासह मतदानातील कथित फेरफार आणि अशोक चव्हाण यांच्या घरवापसीवरही त्यांनी भाष्य केले.

Nana Patole MVA 160 MLAs Claim

Nana Patole MVA 160 MLAs Claim

Nana Patole MVA 160 MLAs Claim: 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार होते, मात्र मतदानाच्या आकडेवारीत फेरफार करून हा विजय रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. सरकारी यंत्रणांच्या अहवालानुसार काँग्रेसचे 75 आणि महाविकास आघाडीचे एकूण 160 आमदार निवडून येतील, असा अंदाज होता, असा दावाही त्यांनी केला. ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने यासंदर्भातील अहवाल सरकार आणि विरोधी पक्षांना दिला होता, असेही पटोले म्हणाले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेत ते बोलत होते.

हा विकास आम्हाला मान्य नाही! कर्जतमधील वृक्षतोडीवरुन रोहित पवार आक्रमक, सरकारला केला थेट प्रश्न

मतदानाच्या आकडेवारीवरून गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करताना पटोले यांनी मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा मुद्दा उपस्थित केला. या वाढीव आकडेवारीत बोगस मतदानाचा समावेश होता आणि त्यातून महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून पुन्हा राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल 400 रुपयांवर जाणार? पटोलेंनी व्यक्त केली भीती

महागाईच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आगामी काळात महागाईचा मोठा भडका उडू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पेट्रोलचे दर 400 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

उपेंद्र लिमयेंच्या आवाजात उलगडणार गुन्ह्यांच्या कथा; ‘क्राइम पेट्रोल’ मराठी’ची नवी सुरुवात

अशोक चव्हाणांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले पटोले?

काँग्रेस सोडून गेलेले काही नेते पुन्हा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या संभाव्य घरवापसीबाबतही भाष्य केले. चव्हाण यांच्याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात मोठा राग असल्याचे ते म्हणाले. देशातील राजकीय वातावरण बदलत असून अनेक नेते पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास उत्सुक असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, अशोक चव्हाण किंवा इतर नेत्यांना पक्षात पुन्हा प्रवेश द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय काँग्रेसचे हायकमांड घेईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्राचं वाळवंट होऊ देणार नाही’

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरूनही पटोले यांनी सरकारला इशारा दिला. या प्रकल्पासाठी 35 हजारांहून अधिक झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकल्पाचे कंत्राटदार असलेल्या टोरंट कंपनीच्या प्रमुख मेहता यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची केंद्राविरोधात हायकोर्टात धाव; अधिकार हिरावल्याचा गंभीर आरोप

मोदी सरकार आणि फडणवीस सरकारला महाराष्ट्राचे वाळवंट करू देणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला. कर्जतमधील वृक्षतोड थांबवली नाही, तर काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीबाबत केलेले आरोप, अशोक चव्हाण यांच्या संभाव्य घरवापसीवरील विधान आणि कर्जतमधील वृक्षतोडीचा मुद्दा यामुळे नाना पटोले यांच्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Exit mobile version