Nangare Patil’s U-turn : नागपुरात डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवरील निर्बंधांवरून राजकारण सुरू असतानाच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या आदेशाबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. नागपुरात सर्व प्रकारच्या डीजे किंवा संगीतावर सरसकट बंदी घालण्यात आलेली नाही. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मल्टीलेयर डीजे-डॉल्बी सिस्टिमवर निर्बंध घालण्यात आले असून, डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर आणि बीम लाइटवर बंदी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने औद्योगिक, व्यापारी आणि रहिवासी क्षेत्रांसाठी निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादेत वाजवल्या जाणाऱ्या साऊंड सिस्टिमना हा आदेश लागू होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
डीजे, डॉल्बी रेग्युलेशनचा आदेश मल्टीलेयर डीजे डॉल्बी सिस्टिमसाठी आहे. डोळ्यांना इजा होणाऱ्या लेझर, बीम लाइट संदर्भात बंदीचा आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी काही औद्योगिक, व्यापारी आणि रहिवाशी क्षेत्रासाठी जी काही ध्वनी मर्यादा घालून दिलेली आहे. त्याच्या अंतर्गत व्यवस्थितपणे वाजवली जातील. त्या साऊंड सिस्टिमना हा निर्णय लागू होणार नाही, असं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं.
वाहनांचं मॉडिफिकेशन करून त्यावर बसवण्यात येणाऱ्या मल्टीलेयर डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवर प्रामुख्याने हे निर्बंध असल्याचं त्यांनी सांगितलं. या सिस्टिममध्ये वापरण्यात येणाऱ्या टॉप आणि बेसमुळे मोठ्या प्रमाणात कंपनं निर्माण होतात. या परिणामाला ‘टनेल इफेक्ट’ म्हटलं जात असल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं. कुठेही ही सिस्टिम चालू असताना डेसिबल मिनिमम 125 च्या वर निघून जातं. हे उल्लंघन स्वाभाविकपणे होतं. प्रतिबंधात्मक स्वरुपाची ही अधिसूचना आहे, असं ते म्हणाले.
ही अधिसूचना सध्या 60 दिवसांसाठी लागू करण्यात आली असून तिचं नूतनीकरण 100 टक्के होणार असल्याचंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे हा आदेश केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून सर्व धर्मांच्या उत्सवांसाठी समान पद्धतीने लागू राहणार आहे. ही अधिसूचना 60 दिवसांसाठी आहे. याचं नूतनीकरण 100 टक्के होणार. सर्वधर्मीयांसाठी त्यांच्या उत्सवाच्या अनुषंगाने ही अधिसूचना लागू राहिलं याची ग्वाही मी देतो. या बाबत काही दुमत असण्याचं कारण नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कठोर कारवाईलाही सामोरं जावं लागू शकतं, असा इशारा नांगरे पाटील यांनी दिला. मुंबई पोलीस कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ शकतात. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत हा गंभीर गुन्हा असून पाच वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानेही ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्याची गंभीर दखल घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना या अधिसूचनेचा उद्देश उत्सवावर निर्बंध घालण्याचा नसल्याचंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं. लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये गणेशोत्सव सुरू करताना त्यामागे जनजागृती आणि समाजात स्फूर्ती निर्माण करण्याचा उद्देश होता. आज लाखो युवक या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे मंडळांच्या उत्साहाला पोलिसांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
नागपुरातील आदेशामुळे संगीतावर बंदी आलेली नाही, असंही नांगरे पाटील यांनी आवर्जून स्पष्ट केलं. कायद्याचं पालन करून आणि निर्धारित ध्वनीमर्यादेत साऊंड सिस्टिमचा वापर करता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये यापूर्वी अशाच प्रकारची अधिसूचना लागू करण्यात आली होती. या पाच जिल्ह्यांतील 144 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गणेश मंडळांच्या सहकार्याने नियमांची यशस्वी अंमलबजावणी केल्याचं त्यांनी सांगितलं. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तुमच्या उत्साहाला आमचा पाठिंबा आहे, असं नांगरे पाटील म्हणाले.
त्यामुळे नागपुरात डीजे किंवा संगीतावर सरसकट बंदी नसून, ध्वनीमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मल्टीलेयर डीजे-डॉल्बी सिस्टिम तसेच डोळ्यांना हानी पोहोचवणाऱ्या लेझर आणि बीम लाइटवर निर्बंध असल्याचं पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
