अमित शहा यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे वृत्त निराधार; उमेश पाटील यांचा खुलासा

Amit Shah NCP Meeting : अमित शहा यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाच्या चर्चांना उधाण आलं असतानाच मोठा खुलासा समोर.

News Photo   2026 11 02T151247.292

Amit Shah NCP Meeting

Amit Shah NCP Meeting : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या भेटीवरून पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. या भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षाच्या नेतृत्वात समन्वय नसल्याचे कथानक काही अदृश्य शक्तींकडून जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे ते म्हणाले. मात्र, हा प्रकार खोडसाळपणाचा असून भेटीबाबत चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. तसेच या शिष्टमंडळासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली होती, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

अमित शाहांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ दिल्लीत, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटलांच्या मंत्रिपदाची चर्चा!

स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे विषय, राज्याच्या हिताचे प्रश्न आणि पक्षाशी संबंधित विविध बाबींची ज्येष्ठ नेत्यांना सखोल माहिती आहे. त्यामुळे या विषयांवर चर्चा करण्यासाठी आजची भेट आधीच ठरवण्यात आली होती. ही भेट पूर्णपणे औपचारिक आणि पूर्वनियोजित होती, असे पाटील यांनी सांगितले. या भेटीत संबंधित नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रश्नही मांडले. तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी नेहमीची अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.

राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना बाजूला ठेवून ही भेट घेण्यात आल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघपणे काम करत आहे. पक्षाच्या नेतृत्वात समन्वय नसल्याचे चित्र उभे करण्यासाठी तथ्यहीन बातम्या पसरवणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

माध्यमांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी वस्तुस्थितीची खातरजमा करावी, असे आवाहन पाटील यांनी केले. मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या औपचारिक भेटीला विनाकारण राजकीय वळण देऊ नये, असेही ते म्हणाले. केवळ तर्कवितर्कांच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे चित्र रंगवण्याऐवजी प्रत्यक्ष घडलेल्या घडामोडी आणि पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांमधील फरक समजून घ्यावा, असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला.

Exit mobile version