बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने उघड केला 13 कोटींचा महा’वितरण घोटाळा; भाजप आमदाराच्या मतदारसंघाचाही उल्लेख

Beed MSEDCL Scam : गेवराईतील महावितरणच्या 13 कोटींच्या कथित घोटाळ्याची आमदार विजयसिंह पंडित यांनी तक्रार करताच मोठी कारवाई.

News Photo   2026 11 20T170800.063

Beed MSEDCL Scam

Beed MSEDCL Scam : बीड जिल्ह्यात महावितरणच्या विद्युत कामांच्या कंत्राटामध्ये तब्बल 13 कोटी रुपयांचा गैरव्यवहार (Beed) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर महावितरणच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार विजयसिंह पंडित यांनी या कामांमधील अनियमिततेबाबत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या तपासणीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

गेवराई मतदारसंघात वीज यंत्रणेच्या दुरुस्ती आणि इतर विद्युत कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, या कामांच्या कंत्राट प्रक्रियेत आणि निधीच्या वापरात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. आमदार विजयसिंह पंडित यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत गैरप्रकार स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

बीडमध्ये डिसेंबरमध्ये चार दिवस सामूहिक विवाह सोहळे; गरजू नवदांपत्यांना मिळणार 25 हजारांचं अनुदान

या प्रकरणात बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांच्यासह अभियंता कुंभार, गोरे, प्रधान आणि गुंजाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ अधिकाऱ्यांना निलंबित करून हा विषय संपणार नाही, अशी भूमिका आमदार पंडित यांनी मांडली आहे. संबंधित कामे करणाऱ्या एजन्सीवरही कारवाई करावी आणि गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, निलंबनाची कारवाई अपुरी असल्याचा आरोप करत आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रशासनावर टीका केली आहे. ही कारवाई केवळ गेवराई तालुक्यापुरती मर्यादित ठेवण्यात आली असून, शिरूर कासार आणि पाटोदा यांसह जिल्ह्यातील इतर भागांतही अशाच प्रकारचे गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात काही बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा आमदार पंडित यांनी दिला आहे.

Exit mobile version